Nashik| साहित्य संमेलनाला आजी-माजी अध्यक्ष उपस्थित राहणार नसल्याने रसिकांचा हिरमोड; प्रमुख पाहुणे मुख्यमंत्रीही ऑनलाईन
साहित्य संमेलनाला संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे हजेरी लावणार नाहीत. त्यामुळे त्यांचे भाषण याची देहा, याची डोळा ऐकण्यासाठी उत्सुक असलेल्या रसिकांचा हिरमोड झाला आहे.
कुसुमाग्रजनगरी, नाशिकः नाशिकमध्ये शुक्रवारीपासून सुरू झालेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे हजेरी लावणार नाहीत. त्यामुळे त्यांचे भाषण याची देहा, याची डोळा ऐकण्यासाठी उत्सुक असलेल्या रसिकांचा हिरमोड झाला आहे. विज्ञाननिष्ठ साहित्यिकाला ऐकण्याची पर्वणी हुकल्यामुळे अनेकांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना नाराजीही व्यक्त केली, तर काही जणांनी त्यांच्या तब्येतीसाठी शुभेच्छा दिल्या.
सारे काही ऑनलाईन
साहित्य संमेलनाला अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हे ऑनलाईन हजेरी लावणार असल्याचे समजते. सोबतच प्रमुख पाहुणे असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. त्यात माजी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो हे सुद्धा गैरहजर राहणार आहेत. त्यामुळे संमेलनाच्या उद्घाटनाला गीतकार जावेद अख्तर आणि साहित्यिक विश्वास पाटील हे दोघेच हजेरी लावणार आहेत. डॉ. नारळीकर यांचे भाषण चित्रीत केले आहे. तेच दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे रसिकांचा हिरमोड झाला आहे. सोबतच कला प्रदर्शनाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुण्या नीलम गोऱ्हे या सुद्धा गैरहजर राहिल्या.
रसिक सुने-सुने
साहित्य संमेलनाला अध्यक्ष डॉ. नारळीकर येणार नसल्याबाबत कवी मनोज बोरगावकर म्हणाले की, साहित्य संमेलन अध्यक्षांची प्रकृती ठीक नसल्याचे समजते. त्यामुळे नाविलाजाने त्यांना तसा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यांचे भाषण ऐकायला मिळणार नाही, याचे शल्य आहेच. संमेलनासाठी कोल्हापूरहून आलेले रविकांत पाटील म्हणाले की, मी दरवर्षी साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो. संमेलनाध्यक्षांचे भाषण ऐकणे याचा आनंद वेगळाच असतो. मात्र, ते उपस्थित राहणार नसल्याचे समजले. त्यामुळे उत्साहावर पाणी फेरले आहे. अर्चना गंभीरे म्हणाल्या की, मी नारळीकरांची अनेक पुस्तके वाचली आहेत. आज त्यांना ऐकण्याचा योग येणार होता. त्यांची भेट घ्यायची होती. सेल्फी काढायचा होता. मात्र, ते येणारच नसल्याने खूप नाराज झाले आहे.
ध्वजारोहण तासभर उशिराने
साहित्य संमेलनातील ध्वजारोहण चक्क एक तास उशिरा, तर ग्रंथप्रदर्शन स्थळाचे उद्घाटन अर्धा तास उशिरा झाले. त्यामुळे या उद्घाटनस्थळाकडे आलेल्या रसिकांना ताटकळत रहावे लागले. साहित्य संमेलनाचे ध्वजारोहण साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, मंत्री छगन भुजबळ, रावसाहेब कसबे, जयप्रकाश जातेगावकर यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर लगेचच ग्रंथप्रदर्शन स्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
इतर बातम्याःकेंद्राविरोधात राज्याचा शड्डू, मंत्री देसाईंची घोषणा; मराठीच्या अभिजाततेसाठी
जनतेच्या न्यायालयात लढा, राष्ट्रपतींकडे याचिका
Nashik| ग्रंथदिंडी निघाली वाजत गाजत, भुजबळांच्या हाती विणा; साहित्य संमेलन होणार अध्यक्षाविना!