पगारवाढीच्या मागणीसाठी नर्सेस भर पावसात रस्त्यावर, लेखी आश्वासनाच्या मागणीसह केडीएमसी मुख्यालयासमोर ठिय्या
किमान वेतनाच्या मागणीसाठी 192 नर्सने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालय आवारात ठिय्या आंदोलन सुरु केले (Protest of Nurses in Kalyan Dombiwali).
ठाणे : ‘नॅशनल अर्बन हेल्थ मिशन’ अंतर्गत असलेल्या नर्स कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले जात नसल्याने आजपासून 192 नर्सने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालय आवारात ठिय्या आंदोलन सुरु केले (Protest of Nurses in Kalyan Dombiwali). पगारवाढीचे लेखी आश्वासन द्या, अन्यथा कामावर हजर होणार नाही, असा निर्वाणीचा इशारा या नर्सने दिला आहे. त्यामुळे केडीएमसी आरोग्य विभागाची चांगलीच कोंडी झाली आहे. ऐन कोरोनाच्या काळात झालेल्या या आंदोलनावर प्रशासन काय भूमिका घेतं याकडे अनेकांचं लक्ष आहे.
कल्याण डोंबिवलीत 2015 पासून एनयूएचएम अंतर्गत 192 नर्स कार्यरत आहेत. त्यांना दर महिन्याला 8 हजार 640 रुपये पगार दिला जातो. अन्य महापालिकांमध्ये हेच काम करणाऱ्यांना किमान वेतनासोबतच वैद्यकीय भत्ते देखील दिले जातात. कोविड काळात कोविड भत्ता दिला जात आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत किमान वेतन दिले जात नाही. सुरक्षेची साधनेही पुरविली जात नाहीत. तसेच कोविड भत्ताही दिला जात नाही. 192 नर्स कोविड काळात वैद्यकीय सेवा देत आहे. त्यांना साप्ताहिक सुट्टीही घेऊ दिली जात नाही.
या प्रकरणी दाद मागण्यासाठी या सगळ्यांनी काल (सोमवारी, 30 जून) महापालिका मुख्यालयात धाव घेतली. रात्री 8 वाजेपर्यंत आयुक्तांच्या भेटीसाठी नर्स थांबून होत्या. आयुक्त व्हीसीमध्ये असल्याने त्यांची भेट झाली नाही. आज पुन्हा या नर्स महापालिका मुख्यालयात आल्या. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचे लेखी आश्वासन दिले गेले नाही. त्यांनी मुख्यालयातील आवारात ठिय्या आंदोलन सुरु केले. जोपर्यंत लेखी आश्वासन दिले जात नाही. तोपर्यंत कामावर हजर होणार नाही, असा पावित्र नर्सेसने घेतला आहे. दरम्यान त्यांना याबाबत एक नोटिसही देण्यात आली आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी या आंदोलनकर्त्या नर्सेसची भेट घेतली आहे. यावेळी गायकवाड म्हणाले, “या विषयी आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली आहे. कोविडप्रमाणे वेतन देण्याचं आयुक्तांनी मान्य केलं आहे. त्याची लेखी ऑर्डरही काढली जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे. मात्र, आम्ही याबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय कामावर येणार नाही, अशी भूमिका नर्सेसने घेतली आहे.
हेही वाचा :
युझर्सचा डेटा परदेशी कंपन्यांना पाठवणारे ‘नमो’ अॅप बंद करा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
माझं मत मी परखडपणे मांडत असतो, गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया
1948, 1965, 1971 आणि 1999 ची युद्ध आम्ही जिंकली, आता तुमची वेळ, काँग्रेसचं मोदींना चॅलेंज
Protest of Nurses in Kalyan Dombiwali