महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण; आग्रा येथे होणार शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे असताना ज्या ठिकाणी नजरकैद होते, ती जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार आहे. आग्रा येथे शिवरायांची गाथा सांगणारं संग्रहालय देखील महाराष्ट्र सरकारकडून उभारलं जाणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून आर्थिक तरदूत करण्यात येणार आहे.
काय आहे शासन निर्णय?
मराठा साम्राज्याने सतराव्या आणि आठराव्या शतकात भारताच्या विविध ठिकाणी आपले साम्राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून रयतेचे राज्य निर्माण केले. हे राज्य निर्माण करण्यासाठी महाराजांना अनेक कष्टप्रद आव्हाने स्वीकारावी लागली. प्रसंगी काही ठिकाणी माघार सुद्धा घेऊन तह करण्यात आले. यापैकीच मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबतचा सन 1665 मध्ये केलेला ‘पुरंदर तह’ असाच ऐतिहासिदृष्या महत्त्वाचा मानला गेला. या करारानुसार महाराजांनी अनेक किल्ले मुघलांना परत केले. तसेच या तहानुसार महाराज बाळराजे शंभुराजे आणि काही निवडक मावळ्यांसह मुघर दरबारात उपस्थित राहिले. यावेळी महाराजांचा मुघल दरबाराकडून अवमान झाल्यामुळे महाराज दरबार सोडून गेले. मात्र त्यानंतर मुघलांनी महाराजांना नजर कैदेत ठेवले. महाराज जिथे नजरकैदेत होते, त्या ठिकाणी दरवर्षी अनेक जण भेट देत असतात. मात्र तिथे महाराजांचं स्मारक असावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे असताना ज्या ठिकाणी कैद होते, ती जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार आहे. आग्रा येथे शिवरायांची गाथा सांगणारं भव्य असं संग्रहालय देखील महाराष्ट्र सरकारकडून उभारलं जाणार आहे. या साठी महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाकडून आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे आता अग्रा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना महाराजांचा इतिहास जाणून घेता येणार आहे.