बाळासाहेबांचा वारस असल्याचे सिद्ध करा, अन्यथा खुर्ची सोडा; विनायक मेटेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत| Vinayak Mete on Uddhav Thackeray
बीड: शेतकऱ्यांच्या मदतीला नेहमी धावून जाणाऱ्या बाळासाहेबांचाच वारसा आपण चालवत आहोत, हे उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करावे. अन्यथा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडून द्यावी, अशी टीका शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केली. विनायक मेटे यांनी नुकताच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बीड भागाचा दौरा केला. विनायक मेटे बैलगाडी घेऊन शेतात गेले होते. अतिवृष्टीमुळे शेतात झालेला चिखल दाखवत मेटे यांनी शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेकडे राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. (Vinayak Mete criticised CM Uddhav Thackeray)
यावेळी विनायक मेटे उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उदाहरण देत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्रही सोडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई सोडून शेतकऱ्यांच्या शेतात जावे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात असत. उद्धव ठाकरे यांनी त्यांचा हा वारसा सिद्ध करावा अन्यथा खुर्ची सोडावी, असे मेटे यांनी म्हटले. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. विनायक मेटे यांनी बीडसह शिरूर तालुक्यातील पौंडूळ, खांबा – लिंबा, खालापुरी या गावातील नुकसानीची पाहणी मेटे केली.
राज्यातील अतिवृष्टीनंतर शरद पवार आजपासून दोन दिवस मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालपासूनच बारामतीमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत दौऱ्याला सुरुवात केली होती. यानंतर ते इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी देणार आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील उद्यापासून अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारभार करण्याच्या कार्यपद्धतीवर टीका होऊ लागली होती.
कदाचित त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सोलापूरच्या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा एक दिवसाचा दौरा असणार आहे. ते विमानाने सोलापूरला जातील आणि तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जाणार आहेत.
कसा असेल मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा? सकाळी 09:00 वाजता – सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण सकाळी 09:30 वाजता – सोलापूर येथून मोटारीने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे), सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा सकाळी 11:00 वाजता – सांगवी पूलाकडे प्रयाण, बोरी नदीची आणि पूरग्रस्त भागाची पाहणी सकाळी 11:15 वाजता – अक्कलकोट शहराकडे प्रयाण, सकाळी 11:30 वाजता अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी, सकाळी 11:45 वा. अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण दुपारी 12:00 वाजता – रामपूर येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची आणि शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी दुपारी 12:15 वाजता – रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण दुपारी 12:30 वाजता – बोरी उमरगे येथे आगमन, आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी दुपारी 12:45 वाजता – बोरी उमरगे येथून सोलापूरकडे प्रयाण दुपारी 03:00 वाजता – पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, अभ्यागतांच्या भेटी, नंतर सोलापूर विमानतळ येथे आगमन आणि मुंबईकडे प्रयाण
संबंधित बातम्या:
(Vinayak Mete criticised CM Uddhav Thackeray)