या आंबेवाल्यानी आम्हाला संस्कृती शिकवायची नाही, संभाजी भिडे यांच्या विधानामुळे कुणाचा संताप ?
Sambhaji Bhide Controversial Statement : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे त्यांच्या खळबळजन आणि तेवढ्याच वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे नवा गदारोळ निर्माण झाला आहे.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे त्यांच्या खळबळजन आणि तेवढ्याच वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे नवा गदारोळ निर्माण झाला आहे. ‘ वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं,’ असं वक्तव्य भिडे यांनी केलं असून त्यामुळे आता वाद पेटला आहे. त्यांच्या या विधानाबद्दल राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत असून अनेकांनी संताप नोंदवला आहे. भिडे या वक्तव्यामुळे महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. आंबेवाल्यांनी आम्हाला शिकवायची संस्कृती नाही असं म्हणत महिला अध्यक्ष पुणे शहर काँग्रेस, संगीता तिवारी यांनी भिडेंवर कठोर टीका केली आहे. तसेच भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही संगीता तिवारी यांनी केली आहे.
काय म्हणाल्या संगीता तिवारी ?
आंबे वाले भिड़े पुन्हा एकदा बरळले. नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी वादग्रस्त विधाने करणारे आंबे वाले भिडे असं म्हणतात की वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ह्या बाबाला काय माहिती आहे ? महिला आपल्या पतीच्या आयुष्यासाठी नटून अलंकार घालून वडाची पूजा करतात. हा महिलांचा सण आहे, त्या सण साजरा करणारच आणि ती आमची हिंदू संस्कृती आहे. ह्या आंबेवाल्यानी आम्हाला नाही शिकवायची संस्कृती. तसेच ज्या महिला ड्रेस मटेरियल घालून जातात त्यांनीही वटसावित्रीच्या पूजेला जाऊ नये, असेही भिडे म्हणालेत. अरे बाबा, तुला बायको ना मुलगी, ना तुला संसार, भटका माणूस आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला. अतिशय बिनडोकपणाचे विधान हा आंबेवाला कायम करतो. हा आंबेवाला कायम महिलांचा, मुलींचा अपमान करत असतो. महिलांच्या बाबत नेहमी वादग्रस्त विधान करायचा किंवा बोलायचा, ह्या आंबेवाल्याला कोणी अधिकार दिला आहे ? असा सवाल तिवारी यांनी विचारला. कधी महिला मुलींची टिकली, कुंकू,कपडे ह्यावर हा माणूस कायम टीका टिप्पणी करीत असतो.
ह्याची हिम्मत तर बघा, आपल्या देशाच्या मिळालेल्या स्वातंत्र्यावर आंबेवाले भिडे म्हणतो की आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य हांडगे आणि दळभद्री स्वातंत्र्यआहे. मग जे लोक हुतात्मे झाले त्यांचा हा माणूस अपमान नाही का करत ?. कसे सहन करतो आपण .आणि का सहन करत आहोत आपण ? ह्याचे हे वक्तव्य म्हणजे राष्ट्राचा, देशाचा, स्वातंत्र्यसैनिकांचा, हुतात्म्यांचा घोर अपमान आहे, असे तिवारी म्हणाल्या. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक लोक फासावर चढले, जेलमध्ये गेले, अनंत यातना त्रास भोगून आपला देश स्वतंत्र झाला. आणि हा माणूस सरळ हांडगा आणि दळभद्री स्वतंत्र म्हणत आहे.
भिडेंनी ताबडतोब माफी मागावी
हे विचार संघी आहेत का भाजपा चे आहेत ? ह्याला कोणी विचाराव, “अरे बाबा हिंदवी स्वराज्याच्या गमजा तू मारत आहेस तत्पूर्वी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुझ्या कडे एक तरी नाव आहे का जे स्वातंत्र्यासाठी लढलेत, फासावर गेले, जेल मध्ये गेले. इंग्रजांविरुद्ध उठाव केलेले एक तरी नाव आहे का? एक तरी नेता आहे का ह्याच्या कडे जो स्वातंत्र्यासाठी लढला आहे. ह्या आंबेवाल्या भिडे नी ताबडतोब हुतात्म्यांची, स्वातंत्र्य सैनिकांची, देशाची आणि आमच्या सर्व आया बहिणींची ताबडतोब माफी मागितली पाहिजे. जर ह्यांनी माफी नाही मागितली तर ह्या आंबेवाल्या भिडे वर नवीन कलमा नुसार राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. जर ह्याच्यावर राष्ट्रद्रोहा चा गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही सर्व देशावर प्रेम करणारी मंडळी रस्त्यावर उतरू, आणि या आंबेवाल्या भिडे विरुद्ध तीव्र आंदोलन करू, असा इसाराही संगीता तिवारी यांनी दिला.
भिडे यांचं विधान काय होतं ?
वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं संभाजी भिडे म्हणाले . स्वातंत्र्याबाबतही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. अशा 10 – 10 हजरांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यात आपल्याला 10 हजरांची तुकडी करायची आहे. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोकं आपल्याला तयार करायची आहेत. आपल्या जे स्वातंत्र्य मिळाला ते हांडगं स्वातंत्र्य आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खर स्वातंत्र्य आहे, असंही भिडे म्हणाले.