हे सलमान खानसारखं प्रकरण… माजलेल्या बापाच्या मुलाला…; संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले ?
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे अपघात प्रकरणात माजलेल्या बापाच्या मुलांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे सलमानसारखं प्रकरण आहे, आरोपवीर कठोर कारवाई झाली पाहिजे.
पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणामुळे आता राजकीय वातावरण तापलं असून अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी पोलिसांना फटकारत पोलिस आयुक्तांना बडतर्फ करा अशी मागणी केली आहे. तर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे अपघात प्रकरणात माजलेल्या बापाच्या मुलांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे सलमानसारखं प्रकरण आहे, आरोपवीर कठोर कारवाई झाली पाहिजे. याची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिरसाट यांनी केली.
काय म्हणाले संजय शिरसाट ?
ते माजलेल्या बापाची मुलं असतात ना, त्यांच्याकडून असे अपघात होत असतील ना तर त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे. याला पक्ष नाही, याला जात नाही, याला धर्म नाही. कोणत्याही गरिबाच्या, सर्वसामान्याच्या शरीरावर गाडी चालवायची, आणि त्यात त्याचा मृत्यू होतो. अन मग हे फरार होतात. अशा लोकांना कोणीही पाठिशी घालणार नाही. तो कितीही मोठ्या बापाचा लेक असला तरीही… हे सलमान सारखंच प्रकरण झालं ना. अनेक लोक बेधुंद होऊन गाड्या चालवतात, ते मोठ्या घरचे असेल तर काय झालं ? सामान्य लोकांचा जीवही तितकाच महत्वाचा आहे. याप्रकरणी न्यायालयाने जो आदेश दिला, त्याचं पालन झालंच पाहिजे असं संजय शिरसाट म्हणाले. तसंच या अपघाताची एसआयटी मार्फतही चौकशी झालीच पाहिजे अशी मागणीही शिरसाट यांनी केली.
पुण्यात शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात पोर्शे गाडीने दुचाकील जोरदार धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली, मात्र काही तासांतच त्याची जामीनावर सुटका झाली. याप्रकरणी पोलिसांनी अलपवयीन आरोपीचे वडील, विशाल अग्रवाल यांनाही अटक केली आहे.
अपघातापूर्वी पबमध्ये होता आरोप, सीसीटीव्ही फुटेज समोर
दरम्यान शनिवारी जेव्हा हा अपघात घडला त्याच्या काही काळ आधी तो अल्पवयीन आरोपी आणि त्याचे मित्र पुण्यातील प्रसिद्ध पबमध्ये गेले होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सुमारे ३० सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एका टेबलवर ४-५ लोक बसलेले दिसत आहेत. समोरच्या टेबलवर अनेक ग्लास, दारूच्या बाटल्या आणि इतरही अनेक ड्रिंक्स ठेवलेली दिसत आहेत. थोड्या वेळाने ती लोकं उठून बाहेर जाताना दिसले.