छगन भुजबळ यांचा मी व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध करतो; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील यांच्याकडून छगन भुजबळ यांचा कडाडून विरोध करण्यात येत आहे. देहूमध्ये बोलताना जरांगे पाटील यांनी भुजबळांचा म्हातारा म्हणत उल्लेख केला. तसंच त्यांच्यावर टीकास्त्र डागलं. छगन भुजबळ यांचा मी व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध करतो, असं ते म्हणाले.
रणजित जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, देहू- पुणे | 20 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रात दौरा करत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध करणाऱ्या ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर जरांगे पाटील हल्लाबोल करत आहेत. पुण्यातील देहूमध्ये बोलतानाही त्यांनी भुजबळांवर घणाघात केलाय. छगन भुजबळांसोबत माझे काही वाद होते. पण व्यक्ती म्हणून कधीच मी त्यांना विरोध नव्हता. मात्र आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. तसंच म्हातारा म्हणत, जरांगे यांनी भुजबळांवर टीका केलीय.
मराठ्याची आलेली सुनामी कोणीच रोखू शकत नाही. मराठ्यांची मुलं शेतातच राहिली. आरक्षण नसल्यानं ही मुलं त्यांची स्वप्न पूर्ण करू शकली नाहीत. लेकरू अधिकारी होत नसल्यानं आई-बाप चिंतेत असतात. आम्ही नेमकं काय पाप केलं हेच कळेना. म्हणूनच आम्ही आरक्षण मिळावं, यासाठी लढा देतोय. पण याला विरोध होतोय. कितीही टक्के पडेल तरी पोर घरीच आहेत. त्यांना सध्या पोस्ट वर समाधान मानावं लागत आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
आम्ही मराठे आरक्षणाच्या सगळी सवलती हे घेणार आहोत. आमच्या लेकराला आरक्षण देण्याची वेळ आली तर विरोध का? माझाकडे एक मंत्री आले होते. मला म्हणाले तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही. मराठ्यांची पोटजात का होऊ शकत .नाही तर तो म्हणाला साहेबाना विचारून येतो, तो परत आलाच नाही, असं म्हणत जरांगेंनी टीकास्त्र डागलंय.
तुकाराम महाराजांच्या मंदिरात जाऊन तुकोबा चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. या सरकारला आरक्षण देण्यासंबंधी सद्बुद्धी द्यावी, असं साकडं तुकोबा चरणी घातलं. हे सरकार आम्हाला आरक्षण देईल, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे. प्रत्येकामध्ये उत्साह आहे की आरक्षण मिळणार आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील आज छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळी अभिवादन करणार आहेत. स्वागतासाठी तुळापूर सकल मराठा समाजाकडून स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रस्त्यावर फुलांचा सडा टाकून जरांगे पाटलांचं स्वागत केलं जाणार आहे.