महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर अधिकाऱ्यांची खैर नाही? प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या याद्या… अनिल देशमुख यांचा दावा काय?
राज्य शासनाने पुण्यातील कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष दिले पाहिजे. एक-दोन अधिकाऱ्यांचे निलंबिन करून चालणार नाही. जे अधिकारी अंमलीपदार्थांच्या घोटाळ्यात दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी माजी गृहमंत्र्यांनी केली आहे.
राज्यातील सांस्कृतिक राजधानी पुण्यात वारंवार ड्रग्स पकडलं जात असून रोज नवनवीन प्रकरणं घडत आहेत. पुण्यातील ललित पाटील प्रकरण ताजे असतानाच आता एफसी रोडवरील पहाटेपर्यंत सुरु असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये ड्रग्ज विकले जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणाची वाचा फोडता हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठेही ड्रग्ज विकले जात असल्यास त्या रेस्टॉरंटवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आता या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशा प्रकरणात एका दोघा अधिकाऱ्यांच्या निलंबनाची धातूरमातूर कारवाई न करता दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सांस्कृतिक नगरी पुण्यात अंमली पदार्थांसंबंधित प्रकरणं वारंवार होणे योग्य नाही, त्यामुळे पुण्याची ओळख पुसली जात आहे. अशा प्रकरणाने पुण्याची बदनामी होत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ‘हिट अँड रन’च्या घटना घडत आहेत. नागपूरच्या राम झुलावरील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपी रितिका मालू 130 दिवसापासून फरार आहे. तिला राजकीय संरक्षण आहे का? अशी चर्चा सुरू असल्याचे राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. वाहतूकीला शिस्त राहीलेली अनेक रस्ते आणि वाहतूकीचे नियम पाळण्यासाठी वाहतूक पोलीसांची संख्या वाढवली पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहेत, त्यामुळे भरती प्रक्रिया गतिमान केली पाहिजे अशी देखील मागणी यावेळी देशमुख यांनी केली आहे.
आम्ही अशा अधिकाऱ्यांच्या याद्या….
तेलंगानामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे. येणाऱ्या पावसाळी विधीमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्यात अनेक अधिकारी सरकारच्या दबावाने नियमबाह्य काम करीत आहेत. सध्याच्या सरकारचे तीन महिन्याचे सरकार उरले आहे. त्यानंतर आमचे महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे दबावात नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या याद्या आम्ही तयार करीत आहोत. जिल्हा जिल्ह्यात अशा याद्या आम्ही तयार करत आहोत असा इशाराही अनिल देशमुख यांनी दिला आहे.
ते तुम्ही अजितदादांना विचाारा
देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचे आंदोलन सुरू असताना त्यांना आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र आजवर ते आश्वासन पूर्ण झालेले नाही आणि याची जाणीव धनगर समाजाला आहे, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. अजितदादा या सरकारमध्ये नाराज असल्याचे बोललं जात आहे असे विचारता देशमुख यांनी हे प्रश्न तुम्ही अजित दादांना विचारले पाहिजेत. मला विचारून कसं चालणार असे उत्तर अनिल देशमुख यांनी दिले. नीट परीक्षा हा 23 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. सध्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तर सुरुवातीला असं काही घडलंच नाही असे जाहीर केले होते. यात सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असेच दिसत आहे. जो कोणी NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणात सहभागी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
केवळ तीन जागा कमी पडल्या
मुख्यमंत्र्यांना दिल्ली दरबारी जाऊन हजेरी लावावी लागते. त्याशिवाय यांचं सरकार चालणारच कसं ? वारंवार दिल्लीला जाऊन माहिती द्यावी लागते. वारंवार परवानगी घ्यावी लागते. भाजपने सर्व 288 जागा लढवल्याच पाहिजे. यांना स्थिती माहीत होईल. आम्ही लोकसभेच्या 35 जागा जिंकू असे सांगितले होते. फक्त चार जागा कमी पडल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवतील असेही ते म्हणाले.