पुणेः परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी ज्यांच्याकडून दापोलीतील रिसॉर्ट (Resort) खरेदी केले, त्या विभास साठे यांच्या घरी ईडीने (ED) छापेमारी सुरु केली आहे. अनिल परब यांच्याही बांद्रा, दापोली येथील निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. आज सकाळी सहा वाजेपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई सुरु केली आहे. परबांच्या घरी गेलेल्या पथकात चार अधिकारी असून त्यांच्याशी संबंधित चौकशी करण्यासाठी एक पथक पुण्यातही पोहोचलं आहे. अनिल परब यांनी दापोली येथील रिसॉर्ट पुण्यातील विभास साठे यांच्याकडून खरेदी केलं होतं. हा 1 कोटी 10 लाखांचा व्यहार झाला होता, असं बोललं जात आहे. या व्यवहारात साठे यांना ब्लॅक मनी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी 2017 मध्ये दापोलीतील 42 गुंठे जागा घेतल्यानंतर त्या जागेबाबत आपण कोणत्याही व्यवहारात नव्हतो, असं मूळ जागा मालक विभाास साठे यांनी पत्राद्वारे यापूर्वी स्पष्ट केले आहे. तर त्यानंतर झालेल्या व्यवहारातील कागदपत्रांवर विभास साठे नावाने बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत आणि त्यासाठी पालकमंत्री अनिल परब यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा उपयोग केला आहे, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
Enforcement Directorate conducts raids at seven locations in Pune and Mumbai of Maharashtra minister and Shiv Sena leader Anil Parab
— ANI (@ANI) May 26, 2022
अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट बांधकामातील गैरव्यवहारावर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत आरोप केले होते. दापोलीतील या रिसॉर्ट संबंधाने विभास साठे यांनी किरीट सोमय्या यांना लिहिलेले पत्रच त्यांनी सादर केले होते. या पत्रात विभास साठे यांनी जागा विकल्यानंतर झालेल्या व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले होते. तसेच मंत्री अनिल परब यांनी 2 मे 2017 रोजी 1 कोटी रुपये देऊन विभास साठे यांच्याकडून 42 गुंठे शेत जमीन विकत घेतली. मात्र त्या जागेवर ज्या अकृषिक परवानग्या घेण्यात आल्या, त्यासंबंधीच्या कोणत्याही कागदपत्रांवर आपण सही केली नाही, असा दावा विभास साठे यांनी केला आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानासह अन्य 7 ठिकाणी आज गुरुवारी सकाळपासूनच ईडीने छापेमारी सुरु केली आहे. परबांची प्राथमिक चौकशी अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. ही चौकशी किती काळ चालेल, अनिल परबांना यानंतर अटक होईल का, या प्रश्नांची उकल लवकरच होईल.