Sangli : कृष्णा नदीतल्या मृत माशांबाबत 2 महिन्यात अहवाल द्या, पुण्याच्या हरित लवाद न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
हरित लवाद न्यायालयाने राज्य सरकार, मत्स्य विभाग, प्रदूषण महामंडळ आणि जिल्हा प्रशासन यांना मृत माश्यांच्या बाबतीत येत्या दोन महिन्यात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
सांगली/पुणे : कृष्णा नदीतील (Krishna River) मृत माशांप्रकरणी तज्ज्ञ समिती नेमून दोन महिन्यात अहवाल देण्याचे आदेश हरित लावदाने सरकारला दिले आहेत. ऐन पावसाळ्यात कृष्णा नदीच्या पात्रामध्ये झालेल्या लाखो माशांच्या मृत्यूप्रकरणी हरित लवादाने दोन महिन्यात मृत माशांबाबत अहवाल (Report on dead fish) देण्याचे आदेश राज्य सरकार आणि प्रदूषण महामंडळला दिले आहेत. स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेण्यात आली. पुण्याच्या हरित लवाद न्यायालयाने हे आदेश देत यासाठी तज्ज्ञ समिती (Committee) गठित करण्याचे आदेशही दिले आहेत. ऐन पावसाळ्यात 12 ते 20 जुलैच्या दरम्यान कृष्णा नदीमध्ये प्रचंड पाणी प्रवाहित असताना लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. विविध संघटनांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली आहे.
स्वतंत्र भारत शेतकरी संघटनेचा आरोप
कृष्णाकाठी असणाऱ्या साखर कारखान्यांच्याकडून नदीपात्रामध्ये रासायनिक मळी मिश्रित पाणी सोडले जाते. त्यामुळेच माशांचा मृत्यू होत आहे, असा आरोप या घटनेनंतर स्वतंत्र भारत शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी प्रदूषण महामंडळ आणि जिल्हा प्रशासनाकडे त्यांनी केली. मात्र याची दखल घेण्यात आली नसल्याने स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी पुण्याच्या हरित लवाद न्यायालयामध्ये धाव घेतली.
‘अहवाल द्यावा’
सुनील फराटे यांनी हरित लवाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. याची दखल घेऊन हरित लवाद न्यायालयाने राज्य सरकार, मत्स्य विभाग, प्रदूषण महामंडळ आणि जिल्हा प्रशासन यांना मृत माश्यांच्या बाबतीत येत्या दोन महिन्यात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर माशांच्या मृत्यूप्रकरणी शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून सत्यशोधन करावे, असेही आदेश देण्यात आले आहेत. आम्ही केलेल्या तक्रारीनंतर संबंधितांवर कठोर करावी केली जाईल, अशी आशा स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी व्यक्त केली आहे. प्रदुषणामुळे हा प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.