विनय जगताप, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, भोर- पुणे | 12 डिसेंबर 2023 : कालिचरण महाराज यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा वाद होण्याची चिन्हे आहेत. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये बोलताना त्यांनी एक वक्तव्य केलं. राममंदिर उद्ध्वस्त व्हावं हे मुस्लिमांचे मनसुबे आहेत, असं कालिचरण महाराज म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नसरापूरच्या बनेश्वर मंदिरात कालीचरण महाराजांच्या हस्ते महाभस्मारती आणि सहस्त्र जलधारा अभिषेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमासाठी परिसरातले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कालीचरण महाराज आणि महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या ठिकाणी बोलताना कालिचरण महाराज यांनी हे वक्तव्य केलं आहे.
दोन दिवसांपूर्वी राममंदिर उद्ध्वस्त व्हावे, असे काही लोकांचे मनसुबे आहेत. असं विधान अयोध्याचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना केलं होतं. त्यानंतर आता कालिचरण महाराज यांनी सुद्धा याबाबत मोठं विधान केलंय. राममंदिर उद्ध्वस्त व्हावं हे मुस्लिमांचे मनसुबे आहेत. तसं त्यांनी टीव्हीवर सांगितलं आहे. 20 वर्षांनंतर जेव्हा आमची संख्या जास्त होईल. तेव्हा राममंदिर आम्ही पुन्हा फोडून टाकू. जी भीती महंतांनी व्यक्त केली ती खरी आहे, असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार व्हावं. सर्व हिंदूंनी भगव्या ध्वजाखाली एकत्रित व्हावं. हिंदुराष्ट्र व्हावं हीच प्रार्थना आहे, असंही कालिचरण महाराज यांनी म्हटलं आहे. राममंदिराच्या उद्घाटनावर बोलताना अयोध्या तो झाकी है और काशी मथुरा बाकी है, असं त्यांनी म्हटलं.
प्रियांका गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरही कालिचरण महाराज यांनी प्रतिक्रिया दिली. आम्हाला सावरकर पाहिजे आहेत. ज्यांना सावरकर नको असतील. त्यांनी काढण्याचा प्रयत्न करा. आम्ही लावण्याचा प्रयत्न करू… लोकांच्या डोक्यात आम्ही सावरकर टाकण्याचा प्रयत्न करू…, असं ते म्हणाले.
बनेश्वर मंदिरात महाआरती करण्याचा अनुभव कसा होता? यावरही कालिचरण महाराज बोलते झाले. बनेश्वर मंदिर हे प्राचीन दिव्य क्षेत्र आहे. या ठिकाणी अद्भुत ऊर्जा आहे. भक्तांनी याठिकाणी स्नान, ध्यान करून आपलं अध्यात्मिक बळ वाढवावं. घराच्या आजूबाजूला असणाऱ्या मंदिरात नागरिकांनी जाऊन ऊर्जा, शक्ती, सौभाग्य, प्राप्त करा असं सगळ्या हिंदूंना आवाहन करतो, असं त्यांनी म्हटलं.