पुणे : राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या कडक शिस्तीने संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. नुकतीच त्यांच्या आदेशाने पुण्यात पक्षांतर्गत झालेली कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे. राजकीय वर्तुळात देखील उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. सध्या राज्यात बाजार समितीच्या निवडणुका सुरू आहे. त्यामध्ये स्थानिक पातळीवर पक्षाच्या पाठिंबा घेऊन पॅनल तयार करून निवडणुका लढविल्या जात आहे. त्याच दरम्यान पुणे जिल्ह्यातही बाजार समितीच्या निवडणुका पार पडत आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही पुण्यातील बाजार समितीत पॅनल तयार करून निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पदाधिकाऱ्याने पक्षाच्या पॅनलला मदत न केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेल्या विकास दांगट यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विकास दांगट यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना मदत न करता भाजपच्या पॅनलला मदत करत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पँनलविरोधात काम करणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ही कारवाई केली आहे.
अजित पवार यांच्या आदेशानं कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीनं पँनल उभा केला आहे. भाजपच्या पँनलचा प्रचार करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पक्षाच्या विरोधात बाजार समितीत काम केल्यास थेट हकालपट्टी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजार समितीच्या निवडणूकीत मोठी भूमिका घेतल्याने पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाढीकऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हा मोठा दणका मानला जात आहे. त्यामध्ये अजित पवार यांच्या आदेशाने ही कारवाई झाल्याची माहिती समोर आल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
अजित पवार यांचे पुणे जिल्ह्यातील राजकारणात बारकाईने लक्ष असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. विकास दांगट यांच्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत असून पुण्यातील राजकीय वर्तुळात या कारवाईची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात ही कारवाई झाल्याने पुन्हा एकदा अजित पवार यांच्या कामाच्या पद्धतीचा अनुभव पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.