चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा ‘ध’ चा ‘म’ कोण करतंय? मी साधा आणि सरळ माणूस पण मळा कळतंय; पाटलांचा रोख कुणावर?
बाबरी मशिदीच्या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या व्यक्तव्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे.
पुणे : भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिद पाडण्याच्या मुद्द्यावरून केलेल्या व्यक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी यासह भाजपवर जोरदार निशाणा साधला. बाबरी मशीद पाडली त्यावेळेला भाजप पळून गेलं होतं आणि त्या वेळेला भाजप नेत्यांनी हे काम शिवसेनेने केलं असं सांगत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. यावरच चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेत माझ्या वक्तव्याचा ध चा म केला गेला असं सांगत बाळासाहेब ठाकरे यांचा कधीही माझ्याकडून अवमान होऊ शकत नाही असेही ठामपणाने सांगितलं.
बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल माझ्याकडून कधीही अवमानकारन बोललं जाणार नाही, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माझ्याकडून चुकूनही अवमान होईल असे वाक्य येणार नाही. त्या मुलाखतीत मला जे म्हणायचे होते ती क्लिप पूर्ण ऐकली तर तुमच्या लक्षात येईल असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं आहे.
याशिवाय माझे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध चांगले होते. उद्धवजी ठाकरे यांच्या सोबतही माझे खूप चांगले संबंध आहेत मी त्यांना फोन करून याबाबत विचारणार आहे. उद्धवजी माझ्या मनात कधीही बाळासाहेबांच्या बद्दल अवमान होईल असं येऊ शकत नाही तरी तुम्ही माझ्या बद्दल असं काय म्हणू शकतात असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं आहे.
मी केलेला विधानाचा नेहमी दुसरा अर्थ काढला जातो. ध चा म केला जातो. आणि हे वारंवार होतंय असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पाटील यांचा रोख नेमका कुणावर होता हे समजलं नसलं तरी हे वारंवार बोलून दाखवत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना कोण टार्गेट करतंय असा सवाल उपस्थित झाला आहे.
मी साधा आणि सरळ माणूस आहे. ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे माझ्यावर कोण काय करतंय हे मला कळतं. मी जे बोललो त्याचा अनेकदा ध चा म झाला आहे. पण मला त्या मुलाखतीत असं म्हणायचे होते की शिवसेना तिथं नव्हती सगळे लोक विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात तिथे होते असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं आहे. याशिवाय मी मांडलेली भूमिका माझी वैयक्तिक भूमिका असल्याचेही पाटील यांनी म्हंटलं आहे.