पुणे : पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार गिरीश बापट यांचे आज निधन झाले आहे. आज सकाळी त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचार केले जात असतांना गिरीश बापट यांचे निधन झाले. काही महिन्यांपासून गिरीश बापट यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची तब्येत काही प्रमाणात सुधारल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा आज त्यांना प्रकृती खालावली होती त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार आदरणीय गिरीशजी बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने पुणे आज पोरकं झालं असल्याची भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, खा. गिरीश बापट यांच्या सारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने पक्षाचा आधारवड हरपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या.
बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ ही ओळख जनमानसात तयार केली होती. आज बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं आहे. बापट साहेबांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
गिरीश बापट यांच्यावर सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. गिरीश बापट यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या शनिवार पेठ येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहेत.
गिरीश बापट यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. यांसह राज्यातील बहुतांश राजकीय नेते उपस्थित राहणार आहे.
गिरीश बापट हे पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. यापूर्वी ते पाच वेळा कसबा पेठ मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले आहे. त्यापूर्वी ते पुणे महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पुणे पालिकेत सत्ता नसतांना गिरीश बापट हे स्थायी समितीचे सभापती झाले होते.