बिबट्या शिकार करून थांबला नाही, तोंडात शिकार करून अख्ख्या गावात फेरफटका मारला, गावकरी धास्तावले…
महाराष्ट्रात सध्या गावागावात बिबट्याचा धुमाकूळ बघायला मिळतोय. पाळीव प्राण्यांबरोबरच माणसांवर देखील बिबट्याचे हल्ल्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
पुणे : खरंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मानवी वस्तीत येऊन बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. वारंवार बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. नाशिकच्या त्रंबकेश्वर तालुक्यामध्ये एका सहा वर्षाच्या चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना आता पुण्यातील जुन्नर मधील राजुरी गावात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने एका कुत्र्याचा फडशा पाडला. बिबट्या इथवरच न थांबता कुत्र्याला तोंडात घेऊन गावभर फेरफटका मारलाय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संपूर्ण जुन्नरयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यातील ग्रामीण भागामध्ये विशेषता जुन्नर परिसरात बिबट्याची मोठी दहशत पाहायला मिळते. सायंकाळची वेळ झाली की बिबट्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असल्याच्या घटना ताज्या असताना आता हल्ला केल्यानंतर गावभर फेरफटका मारत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
तीन-चार दिवसांमध्ये बिबट्याचा कुठे ना कुठे हल्ला झाल्याची घटना कानावर पडत आहेत. यामध्ये पाळीव प्राण्यांना बिबट्याने लक्ष केल्याचं यामध्ये दिसून येत आहेत. शेळ्या, मेंढ्या आणि जनावरे यांच्यावर बिबट्याचा हल्ला सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
बिबट्याकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्याच्या वाढलेल्या घटना बघता शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय आता बिबट्या गावागावात शिरून शिकार करत ती तोंडात घेऊन गावभर फेरफटका मारत असल्याने आता गावकऱ्यांमध्येही भीतीच वातावरण निर्माण झाले आहे.
जुन्नर : शिकार करून बिबट्या थांबला नाही, शिकार तोंडात घेऊन बिबट्याने फेरफटका मारला #leopard #CCTVFootage pic.twitter.com/De63mYtHQU
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) April 7, 2023
वन विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशा स्वरूपाची मागणी आता जोर धरू लागली आहे. जुन्नरच्या राजुरी गावातील घटना सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत असून रात्रीच्या वेळेला गावकरी घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे.
राजुरी परिसरात बिबट्याचे दर्शन अनेक वेळा आढळुन येत आहे. मात्र आता या बिबट्याने अशी दहशत निर्माण केलीय की नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. बिबट्याचे हल्ले पाळीव प्राण्यांवर अधिक वाढल्याने माणसांवरही हल्ल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एकूणच काय संपूर्ण राज्यातच बिबट्याची दहशत गावागावात बघायला मिळत आहे. मात्र, जुन्नर मधील घटना बघता नागरिकांनी घराच्या बाहेर पडावे की नाही अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने याकडे देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.