पुणे : पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गिरीश बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काही दिवसांपूर्वी उपचार सुरू होते. त्यानंतर गिरीश बापट यांना डिस्चार्ज देण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा सकाळच्या वेळेला त्यांची तब्येत खालवल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारा दरम्यानच मृत्यू झाला. गिरीश बापट यांचे अत्यंत जवळचे मित्र म्हणून राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांना प्रतिक्रिया देत असतांना अक्षरशः अश्रु अनावर झाले.
गिरीश बापट आणि अंकुश काकडे यांची चांगली मैत्री होती. पुण्यातील राजकारणात अंकुश काकडे आणि गिरीश बापट हे एकमेकांचे विरोधक असले तरी त्यांची मैत्री सर्वश्रुत होती. बापट यांच्या निधनावर अंकुश काकडे यांना बोलतांना रडायला आले.
पुणे शहराच्या राजकारणात सक्रिय असलेले गिरीश बापट माझे अतिशय जवळचे मित्र होते. गेली 30 ते 35 वर्षे आम्ही राजकारणात एकत्र काम केले. गेल्या काही महिन्यांपासून गिरीश बापट श्वसनाच्या विकाराने आजारी होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मात्र, दुर्दैवाने आज त्यांचे निधन झाले. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा या तिन्ही ठिकाणी अतिशय उल्लेखनीय काम करणारा सहकारी गेला. याचे मला अतिशय दु:ख आहे. पुणे शहराची ही पोकळी कधीही भरून निघणार नाही.
अशी प्रतिक्रिया देत असताना राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांना रडायला येत होते. रडत रडत अंकुश काकडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खरंतर दोन्ही विरोधी पक्षाचे नेते असतांना त्यांची मैत्री अनेकदा चर्चेचा विषय असायची.
गिरीश बापट हे भाजपचे नेते होते. अनेक वर्षे आमदार राहिले होते. तर अंकुश काकडे हे देखील पालिकेचे राजकारणात सक्रिय होते. त्यामुळे दोन्ही राजकीय विरोधक असले तरी त्यांच्या कट्ट्यावरील गप्पा या चर्चेच्या विषय असायच्या. राजकारणाच्या पलीकडील मैत्री बापट यांच्यासोबत अंकुश काकडे यांची होती.
हीच मैत्री आज तुटली गेल्याने अंकुश काकडे यांना अश्रु अनावर झाले. अंकुश काकडे यांनी बापट यांच्या सोबत राजकारणात काम केले आहे. त्यामुळे गिरीश बापट यांचे निधन हा अंकुश काकडे यांच्यासाठी एक मोठा धक्का होता. बापट आजारी असतांना अंकुश काकडे हे अनेकदा त्यांच्या भेटीला जात होते.