भाजप आमदाराच्या विरोधात संजय राऊत यांची सभा, आयोजक मात्र अजित पवार यांचा कट्टर समर्थक, चर्चा तर होणारच…

| Updated on: Apr 26, 2023 | 10:46 AM

भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर आरोप केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज सभा घेत आहे. या सभेचे आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याने केलं आहे.

भाजप आमदाराच्या विरोधात संजय राऊत यांची सभा, आयोजक मात्र अजित पवार यांचा कट्टर समर्थक, चर्चा तर होणारच...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत. भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर संजय राऊत सभा घेणार आहे. दौंड येथील भीमा पाटस साखर कारखान्याच्या संदर्भात संजय राऊत यांनी मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना स्मरणपत्र पाठवून देखील कुठलीही कारवाई न झाल्याने संजय राऊत यांनी सीबीआय आणि ईडीकडे कागदपत्रे पाठविले आहे. ट्याची पोच मिळाल्याचे स्वतः संजय राऊत यांनी सांगितले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी दौंड येथे सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते.

संजय राऊत यांनी सभेच्या संदर्भात सांगत असतांना तेथील शेतकऱ्यांनी सभेचे आयोजन केले होते असेही सांगितले होते. भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याविरोधात संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहे. आज ही सभा पार पडणार असून त्याची तयारी सुरू आहे.

मात्र, हे आयोजन शेतकरी करत असल्याचे सांगितले जात असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रमेश थोरात यांनी केले आहे. सभेच्या स्थळी त्यांच्याकडून पाहणी आणि आढावा देखील घेण्यात आला आहे. रमेश थोरात हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहे. जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष देखील राहिले आहे.

हे सुद्धा वाचा

एकूणच मैदान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गाजवणार असले तरी त्याचे नियोजन हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याने केले आहे. भाजप आमदार राहुल कुल यांच्या विरोधात पुरावे घेऊन संजय राऊत हे सभा घेणार असल्याचे बोलले जात आहे.

राहुल कुल यांच्यावर खरंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतांना संजय राऊत यांनी हे आरोप केले होते. त्याचवेळी राहुल कुल यांनी संजय राऊत यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत थेट ईडीकडेही तक्रार केली आहे.

एकूणच संजय राऊत हे दौंड येथे सभा घेत असले तरी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांच्या सभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी आमदाराने सभेचे आयोजन केले आहे. संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असतांना ही सभा होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.