पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होतेय. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील चौकशीला जाताना सोबत दोन पुस्तक घेऊन गेलेत. कारण वेळ कसा घालवणार? जयंत पाटलांना सरकारने लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी नोटीस पाठवून गिफ्ट दिलंय, असं त्या म्हणाल्या आहेत.
मी लोकसेभेतही बोलले की अनिल देशमुख यांच्या घरी ईडीनं 109 वेळा धाड टाकली. हा खरंतर जागतिक विक्रमच आहे. आता भाजपचेच पदाधिकारी म्हणतायत की मला आता शांत झोप लागते. नवाब मलिक जे टीव्ही वर बोलले ते आता खरं व्हायला लागलं आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
जयंत पाटील यांची सुरू असलेल्या चौकशीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जयंत पाटील साहेबांना आलेल्या ED नोटीसीचा कर्नाटक निकालाशी संबंध असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विनाकारण त्रास देऊन विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा होत असलेला प्रयत्न हा सरकारला कदापि शोभणारा नाही”, असं रोहित पवार म्हणालेत.
जयंत पाटील साहेबांना आलेल्या #ED नोटीसीचा कर्नाटक निकालाशी संबंध असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विनाकारण त्रास देऊन विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा होत असलेला प्रयत्न हा सरकारला कदापि शोभणारा नाही.@Jayant_R_Patil
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 22, 2023
आयएल अँड एफएस प्रकरणी जयंत पाटील यांची पडताळणी सुरू आहे. आयएल अँड एफएस कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जयंत पाटील यांची चौकशी होत आहे. आयएल अँड एफएस प्रकरणात याआधीही अनेकांची नावं समोर आली आहेत. आता जयंत पाटील यांचंही या प्रकरणी नाव समोर आलं आहे. या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी जयंत पाटील यांची ईडी चौकशी सुरू आहे. आयएल अँड एफएस कंपनी प्रकरणात याआधी राज ठाकरे यांचीही चौकशी झाली होती.
जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीचां निषेध करत सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन करत रस्ता रोको केला. सांगलीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर सांगली मिरज रोडवर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी अचानकपणे रस्त्यावर ठिय्या मारत रस्ता रोको आंदोलन केलं. यावेळी ईडी चौकशी आणि ईडीचा या सर्व कार्यकर्त्यांनी निषेध केला . तसंच जयंत पाटील यांना जाणीवपूर्वक या सर्व प्रकरणात अडकवले जाते असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करत सांगलीत रस्ता रोको आंदोलन केलं आहे.