अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 31 डिसेंबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. आज ठाण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली. यावरून संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. सध्याचं राज्य सरकार रेव्ह पार्टी मधूनच निर्माण झालं आहे. गुजरातमधून अमली पदार्थ येत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या ड्रग्स रॅकेट गुजरात कनेक्शन आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.
महाराष्ट्रामधून 17 प्रकल्प राज्या बाहेर गेले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खोटे आकडे देत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तोंड शिवून बसले आहेत. दहशतीखाली महाराष्ट्रातील उद्योगपतींना घेऊन चालले आहेत. मुंबईची वाट लावण्याचं धोरण हे सरकार करत आहे. आमच्या मराठी लोकांच्या तोंडाचा घास पळून लावत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
नारायण राणे यांच्यात ताकद नाही की उद्योग बाहेर चालले आहेत त्यावर बोलावं. नारायण राणे, एकनाथ शिंदे शिवसेनामध्ये होते ना, तर त्यांनी तो बाणा दाखवावा. अजित पवार तुम्ही शरद पवार यांचे नाव सांगता मग सांगा ना की राज्यातून एक ही प्रकल्प बंद होऊ देणार नाही म्हणून… सगळ्यांनी ओवाळणी बंद करावी. शिवसेनेत आम्ही नाते गोती तोडली ना पण आमचे उद्धव ठाकरे उभे आहेत आणि लढत आहेत, असंही राऊत म्हणाले.
पुण्यात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट झाल्याची चर्चा आहे. त्यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकर सकारात्मक आहेत. हुकुमशाही बदलून टाकण्यासाठी ते ठाम आहेत. आंबेडकर यांच्या सभा बघितल्या असतील. तर ते लढाईमध्ये उतरले आहेत. सामंजस्य पणे ते भूमिका बजावत आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.
लोकसभा निवडणूक आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय. महाविकास आघाडी आगामी निवडणुकांमध्ये जिंकेल त्याची जागा, या फॉर्म्युल्यावर काम करत आहे. जयंत पाटील यांनी शिवसेनेशी चर्चा केली आहे. जागा वाटपाचा संदर्भात आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मुंबईत कोण काय बोलतात यावर जाऊ नका, असं राऊतांनी स्पष्ट केलं आहे.