Modi In Pune: मेट्रो ते मुळा-मुठाचं शुद्धिकरण, पंतप्रधानांनी सांगितला विकासाचा रोड मॅप; मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यातील विविध विकास प्रकल्पाचं लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यानंतर त्यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज पुण्यातील (pune) विविध विकास प्रकल्पाचं लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. त्यानंतर त्यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. मोदींनी यावेळी तिकीट काढून उपस्थित मान्यवरांसह आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी युवा विशेषतः दिव्यांग मुला-मुलींशी संवादही साधला. तसेच मुळा-मुठा नदीच्या सुशोभिकरणाच्या प्रकल्पाचंही लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी पुणेकरांना मेट्रोने प्रवास करण्याची सवय लावून घ्या असं आवाहन केलं. तसेच स्वच्छतेचं महत्त्वही पटवून देत केंद्र सरकारने सुरू केलेला विकासाचा रोडमॅप पुणेकरांसमोर मांडला. विकास कामांच्या भूमीपूजनावरून काँग्रेसला चिमटे काढतानाच मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोसाठी घेतलेल्या परिश्रमाचं मोदींनी कौतुकही केलं. मात्र, मोदींनी आजच्या भाषणात काँग्रेसचा एक अपवाद वगळता राजकीय भाष्य करणं टाळलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- आज पुण्याच्या विकासात जोडलेल्या अनेक प्रकल्पांचं भूमिपुजन आणि उद्घाटन झालंय. पुणे मेट्रोच्या भूमिपूजनासह लोकार्पणसाठीही मला संधी दिलीत, हे माझं सौभाग्य आहे. आधी भूमिपूजनं व्हायची, पण माहीत नसायचं की उद्घाटन कधी होणार.. म्हणून आजचं उद्घाटनं जास्त महत्त्वाचं आहे. वेळेत प्रकल्प पूर्ण केलेल जाऊ शकतात हे आज सिद्ध झालेय.
- मुळा मुठा नदीला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी 1100 करोड रुपयांचं प्रकल्प सुरु होतोय. आज पुण्याला एक सुंदर भेट देण्यात आली आहे. आर के लक्ष्मण यांना समर्पित कलादालन तयार करण्यात आलं आहे. एक उत्तम कलादालन पुण्याला मिळालंय. वेगवान विकासासाठी आणि आतापर्यंत केलेल्या कामाचं पुणे प्रशासनाचं आणि पालिकेचं कौतुक आणि अभिनंदन करतो.
- पुण्याने शिक्षण, संशोधन, आयटी, बिझनेसमध्येही आपली ओळख मजबूत केलीये. अशात आधुनिक सेवा सुविधा पुण्याच्या लोकांची गरज आहेत. आमचं सरकार पुण्याची गरज ओळखून काम करते आहे. आनंदनगरपर्यंत मी प्रवास केला. ही मेट्रो पुण्यातील मोबिलिटी अधिक सोपी करेल. प्रदूषण आणि वाहतूककोंडी कमी करेल.. ईज ऑफ लिव्हिंग वाढवेल. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा ते या प्रोजेक्टसाठी सारखे दिल्लीला यायचे. खूप मागे लागले होते हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी. त्यांच्या प्रयत्नांनंही हे यश आहे. त्यांचंही अभिनंदन.
- कोरोना महामारीतूनही मार्ग काढत हा प्रकल्प पूर्ण झालाय. सोलर पॉवरचाही या मेट्रोसाठी वापर होतोय. 25000 टन कार्बन डायऑक्साईडचं एमिशन थांबणार आहे. या प्रकल्पाशी सोडल्या गेलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आपलं योगदान पुण्यातील सगळ्यांना फायदेशीर ठरणार आहे. आपल्या देशात वेगानं शहरीकरण होतंय, हे तुम्हाला माहीत आहेत. 2030 पर्यंत आपली लोकसंख्या शहरी लोकसंख्या 60 कोटींच्याही पुढे जाईल. शहरांतील वाढती लोकसंख्या अनेक संधी निर्माण करतेय. पण त्यासोबतच आव्हानंही वाढताहेत.
- आज महाराष्ट्रात मेट्रोचं जाळ तयार होतंय. आजच्या या दिवशी माझा एक आग्रह आहे. पुणे आणि त्या सर्व शहरांतील लोकांना माझं सांगणं असेल की आपण जेवढं जास्त मेट्रोनं जाल त्याने तुमच्याच शहराला फायदा होणार आहे. 21व्या शतकातील भारताला आधुनिकही बनवायचं आणि त्याला नव्या सुविधाही जोडायच्या आहेत. भविष्यातील योजना लक्षात घेऊन आपण त्यावर काम करतोय.
- इलेक्ट्रीक बस, कार, इलेक्ट्रीक गाड्या, स्मार्ट मोबिलीटी, प्रत्येक शहरात सर्क्युलर इकॉनॉमी बेस्ट मॅनेजमेन्ट सिस्टम, आधुनिक सिवरेज ट्रीटमेन्ट प्लांट, वेस्ट टू वेस्ट गोबर प्लांट, बायोगॅस प्लांट, एनर्जी, एफिशियन्स, पथदिवे एलईडी, या सगळ्या व्हिजनसह आम्ही पुढे जातोय.
- अमृत मिशनला यशस्वी करण्यासाठी सरकारनं मोहीम हाती घेतल्या आहेत. रेरासारखा कायदा आम्ही आणला. मध्यमवर्गाला याचा फायदा होतोय. पैसे द्यायचे, पण वर्षानुवर्ष घर मिळत नव्हतं. सामान्यांचे हाल व्हायचे. मध्यमवर्गीयाला घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी सुरक्षा मिळावी म्हणून रेराचा कायदा मोठं काम करतोय.
- स्वच्छतेवरही फोकस राहायला हवा. अर्बन प्लानिंगशी जोडलेल्या सगळ्या गोष्टींशी जोडलेलं असलं पाहिजे. प्रदूषणातून मुक्ती, कच्च्या तेलाची निर्भरता कमी करणं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी इथेनॉलवर भर देतोय. पुण्यातही यासाठी प्रयत्न सुरु केलेत. इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांचा फायदा होणार आहे. पालिकेनं अनेक कामं सुरु केली आहेत.
- सातत्यानं येणारा पूर आणि प्रदूषणमुक्तीसाठी शेकडो कोटी रुपयांचे प्रकल्प कामी येणार आहेत. मुळामुठेची साफसफाई आणि सुशोभिकरणासाठी केंद्र मदत करतंय. नद्या पुन्हा जिवंत झाल्या तर पुणे शहरालाही नवी जान येईल. वर्षातून एक दिवस नदी उत्सव साजरा केला पाहिजे. नदीच्या प्रती श्रद्धा आणि महात्म्य पूर्ण शहरात नदी उत्सवाचं वातावरण तयार केलं पाहिजे. तरच आपल्याला पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व कळेल.
- पीएम गतीशक्ती नॅशनल मास्टरप्लान बनवला आहे. योजनांचा वेळ लागतो. कारण वेगवेगळ्या मंत्रालयांचा ताळमेळ नसतो. उशिरा होणाऱ्या योजनांचा फटका बसू नये म्हणून पीएम गतीशक्तीमुळे मदत मिळेल. प्रकल्प वेळेत होतील. लोकांची गैरेसोय टळेल. देशाचा पैसा वाचेल. आधुनिकतेसोबत पुण्यातील पौराणिकता, महाराष्ट्राच्या गौरवाला आणि शहरविकासालाही महत्त्व दिलं जातंय.
संबंधित बातम्या:
Modi In Pune: पूर्वी भूमीपूजन व्हायचं पण लोकार्पणाची शाश्वती नसायची; मोदींचा काँग्रेसला चिमटा