पुणे : अकरावी प्रवेशासाठी (11th Admission) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची (Online Admission Process) दुसरी फेरी (Second Round) आजपासून सुरू झाली आहे. 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान ही दुसरी फेरी राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत शनिवारी म्हणजेच 4 सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवड झालेल्या महाविद्यालयात 6 सप्टेंबरपर्यंत आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. (The second round of online admission process for the 11th admission has started from today)
प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती. 31 ऑगस्ट संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करायचा होता. त्यानंतर पहिल्या फेरीची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. त्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातल्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी जाहीर केली आहे.
दुसऱ्या फेरीअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या अर्जाचा दुसरा भाग भरण्याची सुविधा आजपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये नव्याने अर्ज करणे आणि सबमिट करणे, नवीन अर्ज नोंदणी करून अर्जाचा एक भाग व्हेरिफाय करणे, अर्ज सबमिट करणे आणि लॉक करणे, यासोबत अर्जाचे दोन्ही भाग भरून दुसऱ्या फेरीसाठी अर्ज लॉक करणे, यासाठी उद्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे.
यानंतर आलेल्या सर्व अर्जांवर 3 सप्टेंबरला प्रक्रिया करून दुसऱ्या नियमित फेरीतली गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे आणि 4 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता दुसऱ्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यादिवशी विद्यार्थ्यांना महानविद्यालये अलॉट केली जातील. महाविद्यालयांचे कट ऑफ जाहीर केले जातील तसेच विद्यार्थ्यांना यादीमध्ये आपलं नाव दिसेल. याशिवाय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना एसएमएस पाठवले जातील.
विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी आपल्या अर्जात प्रोसिड फॉर अडमिशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रवेशासाठीची आवश्यक कागदपत्रं अपलोड करून प्रवेश निश्चित करण्यासाठी 4 ते 6 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. यानंतर 6 सप्टेंबरला रात्री 10 वाजता रिक्त जागांचा तपशिल वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे.
राखीव गटातल्या विद्यार्थ्यांनी आरक्षण गटातून प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना संबंधित प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी 30 दिवसांच्या आत जातीचं प्रमाणपत्र सादर करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला आहे, त्यांनी अर्जाची पोचपावती आणि सोबत वडिलांचं जात प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे स्वतःचं जात प्रमाणपत्र किंवा अर्जाची पोचपावती नाही, त्यांनी वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 30 दिवसांच्या आता आपलं जात प्रमाणपत्र सादर केलं नाही, त्यांचा प्रवेश रद्दा केला जाणार आहे.
यापूर्वी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली होती. ती वाढवून आता 30 दिवस करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश निश्चिती करताना सुरूवातीला नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पावती सादर करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. पण त्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचं लक्षात आल्यानंतर आता पालकांना 30 दिवसांच्या आत नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करू या आशयाच्या हमीपत्रावरही प्रवेश दिला जाणार आहे.
इतर बातम्या :