प्रशिक्षणात 13 वर्षाच्या एनसीसी कॅडेटला गोळी लागली, प्रशिक्षकाला अखेर शिक्षा सुनावली
पराग इंगळे हा पुण्याच्या पाषाण परिसरातील लॉयोला स्कूलचा विद्यार्थी होता. ज्या दिवशी घटना घडली, त्यादिवशी प्रशिक्षक घाणेकर परागला जमिनीवर झोपून फायरिंग कशी करावी याचे प्रशिक्षण देत होते.
पुणे : देशसेवेची संधी मिळण्यासाठी सैन्यात जाण्यासाठी तरूण एनसीसीमध्ये भरती होत असतात. एनसीसीचे प्रशिक्षण खडतर असते. या प्रशिक्षणातून एकप्रकारे देशाचे भावी सैनिकच तयार होत असतात. एखाद्या प्रसंगी लष्कराला जवानांची कमतरता भासली तर दुसरी फळी तयार असावी म्हणून नॅशनल कॅडेट कॉर्पस अर्थात एनसीसीला खूप महत्व आहे, तेरा वर्षांपूर्वी पुण्याच्या एनसीसी मुख्यालयात एक अपघात घडला होता. एनसीसीच्या प्रशिक्षणा दरम्यान एका तेरा वर्षीय विद्यार्थ्याला गोळी लागली होती. या प्रकरणात तब्बल तेरा वर्षांनी न्यायालयाने निकाल दिला आहे.
साल 2013 च्या फेब्रुवारी महिन्यात पुण्याच्या सेनापती बापट मार्गावरील राष्ट्रीय छात्र सेना ( एनसीसी ) मुख्यालयात बंदूकीचे प्रशिक्षण सुरू होते. त्यावेळी प्रशिक्षक आमोद अनिल घाणेकर ( वय 27 , मेहुणपुरा, शनिवार पेठ ) यांच्या बंदूकीतून सुटलेली गोळी पराग देवेंद्र इंगळे ( वय 13 ) याच्या डोक्याला लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पुणे सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांच्या न्यायालयात खटला उभा राहीला होता. त्याचा निकाल अखेर आला आहे.
जमिनीवर झोपून फायरिंग करताना अपघात
पराग इंगळे हा पाषाण परिसरातील लॉयाेला स्कूलचा विद्यार्थी होता. ज्या दिवशी घटना घडली, त्यादिवशी प्रशिक्षक घाणेकर परागला जमिनीवर झोपून फायरिंग कशी करावी याचे प्रशिक्षण देत होते. या दरम्यान, पराग अचानक उभा राहीला. आणि घाणेकर याच्या बंदूकीतून सुटलेली गोळी परागच्या डोक्याला लागली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात डेक्कन पोलीस ठाण्यात आमोद घाणेकर यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात तपास झाल्यानंतर कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात आपला काही दोष नाही, आपल्याकडून चुकीने हे झाले त्यामुळे या प्रकरणातून आपल्याला वगळण्यात यावे अशी याचिका घाणेकर यांनी दाखल केली होती. परंतू सप्टेंबर 2014 रोजी त्यांची याचिका कोर्टाने फेटाळली. विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. राजेश कावेडीया यांनी काम पाहीले.
तीन लाख रूपये परागच्या कुटुंबियाना भरपाई
या प्रकरणात घाणेकर यांना हलगर्जीतून पराग याच्या मृत्यूस जबाबदार ठरवत सात वर्षांची सक्तमजुरी आणि पाच लाख रूपयांचा दंड अशी शिक्षा सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी सुनावली. या पैकी तीन लाख रूपये पराग इंगळे याच्या कुटुंबियाना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. जर दंड न भरल्यास त्यांना आणखी एक वर्षांची शिक्षा भोगावी लागेल असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.