पुण्यात तब्बल 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा; Warje Police ठाण्यात चेअरमन, सेक्रेटरीविरोधात गुन्हा
वारजे माळवाडी (Warje Malwadi) भागात रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीमध्ये 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा (Scam) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी सदनिका दुसऱ्याच लोकांना विकून ही फसवणूक (Cheating) केली आहे.
पुणे : वारजे माळवाडी (Warje Malwadi) भागात रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीमध्ये 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा (Scam) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी मूळ सभासद असलेल्या हक्काच्या सदनिका दुसऱ्याच लोकांना विकून ही फसवणूक (Cheating) केली आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात या सोसायटीचे चेअरमन अंबादास गोटे आणि सेक्रेटरी गणेश माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पाच एकर जागेवर भटक्या विमुक्त समाजातील लोक राहत होते. मात्र त्यावेळेस या लोकांची फसवणूक करत हे फ्लॅट परस्पर विक्री करण्यात आले. यामुळे याविरोधात लढा देणाऱ्या नागरिकांनी आम्हाला आमची घरे परत मिळावीत, अशी मागणी केली आहे.
218 सभासदांनी नोंदविली नावे
चेअरमन अंबादास गाटे आणि सेक्रेटरी गणेश बजरंग माने (वय 42, रा. शिरूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. तर कामगार कंत्राटदार दीपक अशोक वेताळ (वय 40, रा. मोशी) यांनी याविषयी तक्रार दाखल केली. वारजे माळवाडी येथे गृहप्रकल्प उभारला जाणार होता. यासाठी 218 सभासदांनी नावे नोंदविली होती. या सभासदांना सरकारकडून मिळणाऱ्या जागेवर घरे बांधून देण्याचे आमिष या आरोपींनी दिले होते. याविरोधात अशोक वेताळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
1990पासून स्वीकारल्या रकमा
दीपक वेताळ आणि अन्य सभासदांकडून जवळपास 1990पासून आजपर्यंत आरोपींनी वेगवेगळ्या प्रकारे रोख रकमा स्वीकारल्या. तसेच शासनाकडून 1 हेक्टर 76 गुंठे जमीनदेखील प्राप्त करून घेतली. या जागेवर 396 सदनिकांचा मोठा गृह प्रकल्प उभारण्यात आला. मात्र आता या प्रकल्पात मूळ सभासदांना सदनिका न देता भलत्याच व्यक्तींना त्या विकल्या. यामुळे आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.