पुणे : पुण्यात तब्बल 2 हजार 439 किलो ड्रग्ज नष्ट करण्यात आले आहे. पुणे सीमा शुल्क आयुक्तालय आणि महसूल गुप्तचर संचालनालय, पुणे प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. काल (8 जून) झालेल्या अमली पदार्थ निर्मूलन दिनाच्या (Drug Destruction Day) पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. मेसर्स महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर लिमिटेड, MIDC, रांजणगाव येथील अत्याधुनिक प्लाझ्मा गॅसिफिकेशन-आधारित इन्सिनरेशन सुविधेमध्ये हे ड्रग्ज नष्ट करण्यात आले. मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या (Muktangan rehabilitation centre) संचालिका मुक्ता पुणतांबेकर तसेच समन्वयक सोनाली काळे यांनीही या कारवाईला हजेरी लावली. अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि तस्करीविरुद्ध मजबूत संदेश देण्यासाठी, महसूल गुप्तचर संचालनालयासह केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या कार्यालयांनी 42,054 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ, 17,10,845 गोळ्या, 72,757 खोकल्याच्या सिरपच्या बाटल्या आणि 136,364 किलोग्राम अंमली पदार्थ नष्ट केले.
कारवाईचा एक भाग म्हणून, पुणे सीमाशुल्क आयुक्तालय आणि महसूल गुप्तचर संचालनालय, पुणे प्रादेशिक युनिट यांनी जप्त केलेल्या 2439 किलो ड्रग्जची विल्हेवाट लावली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी CBICच्या अधिकार्यांचे अंमली पदार्थांच्या तस्करीशी लढा देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल कौतुक केले आणि मुक्तांगण पुनर्वसन केंद्रासारख्या व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांची प्रशंसादेखील केली. तरुणांसोबत मोठ्या प्रमाणावर या संस्था काम करतात, अंमली पदार्थांच्या धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करतात आणि व्यसनाधीनांचे पुनर्वसन करतात. या सर्वांबद्दल त्यांनी या संस्थांचे कौतुक केले.
देशभरातही अशाप्रकारे अमली पदार्थ नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. अमली पदार्थांचा विळखा तरुणाईला जास्त बसत आहे. त्याचे आजच्या तरुणाईवर प्रतिकूल परिणाम होत आहेत. त्यामुळे अमली पदार्थ निर्मूलन दिनी अशाप्रकारची कारवाई केली जाते. यादिवशी अमली पदार्थ नष्ट करून एक संदेश देण्यात येतो. पुण्यातही अशाप्रकारे अंमली पदार्थ नष्ट करून व्यसनाधीनता सोडण्याचा संदेश देण्यात आला.