Pune malnutrition : पुणे जिल्ह्यात 220 बालकं तीव्र कुपोषित! जिल्हा परिषदेअंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात उघड, वाचा सविस्तर
कोरोनाचा काळ आणि त्यानंतर आता तीव्र उन्हाळा आणि पुढे येत असलेल्या, पावसाळा यामुळे कुपोषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने राज्यात गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पुणे : पुणे जिल्हा परिषद अंतर्गत महिला (Pune ZP) व बालकल्याण त्याचसोबत एकात्मिक बालविकास विभागामार्फत केलेल्या सर्वेक्षणात 220 बालके ही तीव्र कुपोषित (Malnourished children) आढळून आली आहेत. या सोबत 741 बालके मध्यम कुपोषित असल्याचे सर्वेक्षणात उघड झाले आले. या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील जुन्नर (Junnar) तालुक्यात सर्वाधिक 46 तीव्र कुपोषित बालके आढळून आली. त्या पाठोपाठ आंबेगाव तालुक्यात 31, बारामती आणि शिरूर तालुक्यात प्रत्येकी 28, दौंड आणि पुरंदर तालुक्यात प्रत्येकी 19, मावळमध्ये 14, हवेलीत 10, मुळशी तालुक्यात 8, वेल्हा येथे 7, खेड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी 4 तर भोरमध्ये 2 तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत. जिल्ह्यात सध्या कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहेत. त्यात ही आकडेवारी समोर आली आली आहे. जीवनसत्वे तसेच योग्य प्रमाणात आहार न घेतल्याने बालकांमध्ये ही समस्या निर्माण होत आहे.
बालकांच्या करण्यात आल्या तपासण्या
कोरोनाचा काळ आणि त्यानंतर आता तीव्र उन्हाळा आणि पुढे येत असलेल्या, पावसाळा यामुळे कुपोषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने राज्यात गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्ह्यात तीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये आतापर्यंत 77 हजार 773 मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामधे बालकांचे वजन, त्यांची उंची, होत असलेली वाढ याबाबत तपासण्या करण्यात येत आहेत. त्यातून हा सर्व समोर आला आहे
आहारात पुरेशा घटकांचा समावेश हवा
योग्य आहार न मिळाल्याने अनेक लहान मुलांमध्ये अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती उद्भवत आहे. अशा बालके कुपोषित म्हणून गणली जातात. कुपोषण हा आजार नसून अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्वांचा अभाव याचा परिणाम आहे. बालकांच्या आहारातील कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे यांच्या कमतरतेमुळे कुपोषण होते. आहारातील या घटकांच्या कमतरतेमुळे कुपोषण होते. हे घटक शरीराला मिळाल्यास बालकांचे योग्य पोषण होऊन बालक कुपोषणापासून दूर राहू शकते.