Pune crime : ‘गुगल पे’ लिंक क्लिक केली अन् खात्यातून पैसे डेबिट! घरमालकाची ऑनलाइन फसवणूक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
प्रारंभिक अर्ज शहर पोलिसांच्या सायबर सेलकडे हलविण्यात आला, या माध्यमातून या प्रकरणाचा तपशीलवार फॉरेन्सिक तपास केला आणि अहवाल पोलीस स्टेशनला पाठवला त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.
पुणे : भाडेकरू असल्याचे भासवून एका सायबर ठगाने (A cyber fraudster) विमाननगर येथील फ्लॅट मालकास 1.38 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. 5 जानेवारी 2022 रोजी घडलेल्या या घटनेबाबत संबंधित फ्लॅट मालकाने 2 सप्टेंबर रोजी लोहगाव पोलीस ठाण्यात (Lohgaon police station) तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय तक्रारदाराने आपल्या फ्लॅटसाठी भाडेकरू हवा आहे, अशा आशयाची ऑनलाइन जाहिरात प्रसिद्ध केली होती. तक्रारीमध्ये म्हटले आहे, की आरोपी महिलेने फ्लॅट मालकाच्या नंबरवर व्हॉट्सअॅप कॉल (Whatsapp call) केला आणि त्याला सांगितले, की आपण आर्मीमध्ये आहोत. फ्लॅटसाठी आगाऊ पैसे देत असल्याचे म्हणत आरोपीने एक गुगल पेची एक लिंक पाठवली आणि याच माध्यमातून फसवणूक केली आहे. दरम्यान, संबंधित आरोपीचे ठिकाण शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
सायबर पोलिसांत धाव
घर मालकाने लिंक अॅक्सेप्ट केली आणि त्याच्या खात्यातून 1.38 लाख रुपये डेबिट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फ्लॅट मालकाने पोलिसांत धाव घेतली. सर्व पुरावे सायबर पोलिसांकडे सादर केले आणि या प्रकरणाच्या तपासासाठी अर्ज दाखल केला.
आरोपी पश्चिम बंगालमधील असल्याचे स्पष्ट
प्रारंभिक अर्ज शहर पोलिसांच्या सायबर सेलकडे हलविण्यात आला, या माध्यमातून या प्रकरणाचा तपशीलवार फॉरेन्सिक तपास केला आणि अहवाल पोलीस स्टेशनला पाठवला त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सायबर फसवणुकीशी संबंधित आरोपीची ओळख पश्चिम बंगालमधील रहिवासी मल्लिका उज्ज्वल बर्मन आणि तिचे दोन सहकारी अशी केली आहे.
आरोपींवर गुन्हा दाखल
माहिती तंत्रज्ञान कायदा आणि आयपीसी कायद्यांतर्गत सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी दगडू हाके यांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन पैसे पाठवताना कोणत्याही लिंकची गरज नसते. त्यामुळे मेसेजच्या माध्यमातून अथवा इतर कोणत्याही माध्यमातून आलेली लिंक क्लिक करू नये, असे पोलिसांनी सांगितले आहे.