दिवे घाटात भीषण अपघात, दुचाकीला धडक देत टँकर थेट दरीत कोसळला !
सासवडहून पुण्याच्या दिशेने टँकर चालला होता. दिवे घाटातून उतरत असतानाच टँकरने दोन दुचाकींना धडक दिली. यानंतर भीषण घटना घडली.
अभिजीत पोते, TV9 मराठी, पुणे : पुण्याजवळील दिवे घाटमार्गात भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. वर्दळीचा मार्ग असलेल्या या घाटरस्त्यात भरधाव वेगातील टँकर पलटी झाला आणि दरीत कोसळला. या टँकरने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण स्वरूपाचा होता की टँकरची धडक बसून चौघा दुचाकीस्वारांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताने दिवेघाट महामार्गातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातग्रस्त टँकरच्या केबिनमध्ये दोन जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या दोघांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत. सायंकाळच्या सुमारास अपघात झाल्यामुळे अंधारात बचावकार्य करताना अग्निशमन दलाच्या जवानांना आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. या अपघाताची लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
सासवडहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात येत होता टँकर
अपघातग्रस्त टँकर पुणे-सासवड मार्गावरून भरधाव वेगाने चालला होता. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा टँकर सासवड येथून पुण्याच्या दिशेने चालला होता. याचदरम्यान दिवे घाटातील तीव्र उतारावर टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि टॅंकर जागीच पलटी होऊन त्याची दोन दुचाकींना जोरदार धडक बसली. अपघात भीषण स्वरूपाचा घडल्याने त्यात दोन दुचाकीस्वारांना जागीच प्राणाला मुकावे लागले.
सासवडला निघालेल्या दोन दुचाकींवर चौघेजण बसले होते. त्यातील दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांकडून समजते. टँकरच्या केबिनमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य हाती घेतले. याचदरम्यान लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
टँकरला झालेल्या अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. टँकरचा चालक भरधाव वेगात ड्रायव्हिंग करत होता. यावेळी त्याने दारूची नशा केली होती का, याचा देखील अधिक तपास लोणी काळभोर पोलिसांकडून केला जात आहे. अपघाताचे वृत्त समजताच दिवे घाटमार्गाच्या जवळील परिसरात राहणारे स्थानिक रहिवासीही मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.
या अपघातामुळे घाटरस्त्यातील वाहतुकीचा वेग मंदावला असून, अपघात घडलेल्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. अपघाताला नेमका कोणाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला, याचा तपास करूनच गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.