Pune : आणखी एका चिमुकलीचा मृत्यू, मलनिस्सारणाच्या खड्ड्यात पडल्यानं गमावला जीव; पुण्यातल्या कोरेगाव खुर्दमधली घटना
कोरेगाव खुर्द येथील माळवाडी भागात राहणाऱ्या कडुसकर कुटुंबाने घराच्या उत्तर बाजूला मलनिस्सारण आणि शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी शोषखड्डा खोदला होता. त्यातच हा दुर्दैवी प्रकार घडला आहे.
आंबेठाण, पुणे : मलनिस्सारणासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. मलनिस्सारणासाठी हा खड्डा खणला आहे. या शोषखड्ड्यात पडून गुदमरून गाथा नितीन कडुसकर या चिमुकलीचा मृत्यू (Dead) झाला आहे. गाथा ही कडुसकर दाम्पत्याची एकुलती एक मुलगी होती. तिच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशाप्रकारचे खणलेले खड्डे लहान मुलांसाठी धोकादायक बनत आहेत. अशाच प्रकारची घटना चार दिवसांपूर्वी आंबेठाण (Ambethan) गावातील लांडगे वस्तीवर घडली होती. शेतातील खड्ड्यात बुडून तीन चिमुकल्या भावडांचा दुर्दैवी मृत्यू (Children Dead) झाला. शेतात एका व्यक्तीने खड्डा उकरून ठेवला. या खड्ड्यात पाणी साचले होते. त्या ठिकाणी खेळता खेळता तीन भावडे पाण्यात बुडाली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
नेमके काय घडले?
कोरेगाव खुर्द येथील माळवाडी भागात राहणाऱ्या कडुसकर कुटुंबाने घराच्या उत्तर बाजूला मलनिस्सारण आणि शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी शोषखड्डा खोदला होता. मात्र मागील काही दिवसांपासून सर्वत्रच पाऊस सुरू आहे. परिणामी या खड्ड्यात पाणी साचले होते. पावसामुळे सध्या बांधकामही बंद ठेवण्यात आले होते. त्यातच हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. खेळता खेळता गाथा खड्ड्याजवळ पोहोचली. कागदाबरोबर खेळताना ती पाण्यात पडली. इकडे तिच्या घरच्यांनी बराच वेळ दिसली नाही म्हणून शोध घेतला. त्यावेळी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात ती खेळत असलेला कागद पाण्यावर तरंगताना दिसला. या खड्ड्यात तिचा शोध घेतला असता ती मृतावस्थेत आढळून आली.
तीन भावंडांचाही असाच झाला मृत्यू
आंबेठाण गावातील लांडगे वस्तीवर बिहार येथील किशोर दास यांचे कुटुंब कामाच्या निमित्ताने राहते. याठिकाणी एका खासगी व्यक्तीने खड्डा उकरून ठेवला होता. त्या ठिकाणी खेळता खेळता किशोर दास यांच्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांना एकूण चार अपत्ये होती. त्यातील तिघांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. रोहित दास (वय 8), राकेश दास (वय 6), श्वेता दास (वय 4) यांचा यात मृत्यू झाला. दरम्यान, पावसाचे दिवस आहेत. लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नये. तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवावे, जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.