योगेश बोरसे, पुणे : ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याची घटना पुण्यातील सिंहगड रोडवरील किरकिटवाडी फाट्याजवळ घडली. या धडकेत दुचाकीवरील नवविवाहित महिला समोरुन येणाऱ्या टँकरखाली पडून चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शिवानी शैलेश पाटील असे मयत नवविवाहितेचं नाव आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेनंतर डंपर आणि टँकर ही दोन्हीही वाहने घेऊन संबंधित चालक फरार झाले असून, पोलिसांकडून दोन्हीही वाहनांचा शोध सुरू आहे.
शिवानी पाटील यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या आपले पती शैलेश पाटील यांच्यासोबत दुचाकीवरुन कामाला जात होत्या. किरकटवाडी फाट्याजवळ वाहनांची वर्दळ असताना मागून भरधाव वेगात आलेल्या अवजड डंपरने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यानंतर शिवानी या पतीसह रस्त्यावरच पडल्या. यावेळी समोरुन येणाऱ्या पाण्याच्या टँकरचे चाक शिवानी यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांकडून दोन्हीही वाहनांचा शोध सुरू आहे. डंपर आणि टँकरची रोजचीच घाई नागरिकांच्या जीवावर बेतताना पहायला मिळत आहे. नांदोशी येथील दगड खाणीतून अवजड वाहतूक करणारे डंपर नियम डावलून, भरधाव वेगाने किरकटवाडी आणि मुख्य सिंहगड रस्त्यावरुन ये-जा करत असतात. नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 11 वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना आज दुपारी घडली. अपघातात एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. काही जखमींना रुग्णालयात भरती केलं जातंय. वाहतूक काही काळासाठी ठप्प आहे.