दौंड : भरधाव वाहन चालकांविरोधात वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई होत असतानाही वाहन चालकांमध्ये कायद्याची भिती नसल्याचे चित्र दिसत आहे. भरधाव वाहनांमुळे रोड अपघातांची संख्याही वाढली आहे. पुण्यातील दौंड तालुक्यातही अशीच एक अपघाताची घटना शनिवारी घडली आहे. भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. नेहल अप्पासाहेब गावडे असे अपघातात मयत तरुणाचे नाव आहे. अपघातात मर्सिडीज चालकही किरकोळ जखमी झाला आहे.
नेहल गावडे हा तरुण बिरोबावाडी येथील ग्रामदैवत असलेल्या बिरोबाच्या दर्शनासाठी गेला होता. दर्शन घेऊन दुचाकीवरुन घरी परतत असतानाच पाटस ते दौंड अष्टविनायक मार्गावर त्याच्या दुचाकीला भरधाव मर्सिडीजने धडक दिली. या धडकेत नेहलच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मर्सिडीज चालक गंभीर जखमी झाला.
दरम्यान, तरुणाच्या मृत्यूची माहिती मिळताच बिरोबावाडी ग्रामस्थ संतप्त झाले. ग्रामस्थांनी सदर मर्सिडीज कार पेटवून दिली. यामुळे अष्टविनायक मार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. काही वेळाने विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.
साखरपुड्याच्या कार्यक्रमाकरीता जाणाऱ्या कुटुंबीयांच्या ट्रॅव्हल्सला औरंगाबाद-नगर हायवेवर अपघात झाला. चव्हाण कुटुंबीय बारामती येथून औरंगाबादच्या दिशेने खाजगी ट्रॅव्हल्समधून जात होते. यावेळी औरंगाबाद-नगर हायवेवर लिंबे जळगावजवळ ट्रॅव्हल्सचा पुढील टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. ट्रॅव्हल्स रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरला धडकल्याने ट्रॅव्हल्सचा पुढील भाग चक्काचूर झाला.