अभिजीत बिचुकले यांचा राज्यातील सर्व प्रश्नांवर रामबाण उपाय; म्हणाले, माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एमपीएससी आंदोलकांची आजची बैठक रद्द झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार एमपीएससी विद्यार्थी सोबत घेणार बैठक घेणार होते.
पुणे : कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले यांनी राज्यातील सर्व प्रश्नांवर एक नामी उपाय सांगितला आहे. माझ्या पत्नीला मुख्यमंत्री करा. म्हणजे राज्यातील सर्वच प्रश्न सुटतील, असा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला आहे. बिचुकले यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचं आवाहनही केलं.
मुख्यमंत्री साताऱ्याचे आहेत. मी पण साताऱ्याचा आहे. त्यांच्या सुनेला म्हणजे माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा सर्व प्रश्न लगेच सुटतील. माझी पत्नी मुख्यमंत्री झाल्यावर पहिला प्रश्न या विद्यार्थ्यांचा सोडवणार, असा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला. आयोगाने या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मधला मार्ग काढला पाहिजे. आयोग म्हणतंय 2023 आणि विद्यार्थी म्हणतायत 2025. मात्र यामध्ये 2024 पासून नवा अभ्यासक्रम लागू करून मधला मार्ग काढावा, अशी मागणी बिचुकले यांनी केली.
आंदोलनाला पाठिंबा
अभिजीत बिचुकले हे कसबा विधानसभा पोटनिडणुकीत उभे आहेत. निवडणुकीचा प्रचार संपायला दोन दिवस उरलेले असतान बिचुकले प्रचार सोडून विद्यार्थ्यांना भेटायला आले आहेत. यावेळी त्यांनी निवडणुकीवरही भाष्य केलं. मला निवडणूक महत्त्वाची नसून मला या विद्यार्थ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आलोय, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तोडगा काढणार
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीच्या प्रश्नावर तोडगा काढणार असल्याचं सांगितलं आहे. विद्यार्थ्यांशी मी संवाद साधला आहे. सध्या एमपीएससी प्रश्नावर राजकारण सुरू आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्ही प्रश्न सोडवणारे आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
बैठक रद्द
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एमपीएससी आंदोलकांची आजची बैठक रद्द झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार एमपीएससी विद्यार्थी सोबत घेणार बैठक घेणार होते. पण ही बैठक आता रद्द झाली आहे. राज्यसेवेच्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी 2025 पासून सुरू करा, या मागणीसाठी सलग चौथ्या दिवशीही एमपीएससी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.