Accident : अहमदनगर-पुणे महामार्गावर महिनाभरात तब्बल 23 जणांनी गमावले प्राण, नागरिकांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर रोष
मागील काही दिवसांपासून नागरिकांकडून सातत्याने याविषयी आवाज उठवला जात आहे. आठ ते नऊ मोठे अपघात झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि चेतक इंटरप्रायझेसला नागरिकांनी जबाबदार धरले आहे.
अहमदनगर : अहमदनगर-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातांचे (Accident) सत्र वाढले आहे. नगर ते वाडेगव्हाण या दरम्यान मोठ मोठी वळणे, सूचना फलकांचा अभाव तसेच अनेक ठिकाणी दुभाजक फोडल्याने हे अपघात होत असल्याचा आरोप नागरिक करत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर-पुणे (Ahmednagar-Pune road) महामार्गावर रोज अपघात होत असून गेल्या महिनाभरात या महामार्गावर तब्बल 23 व्यक्तींनी आपले प्राण गमावले आहेत. यावेळी या रस्त्यावर होणाऱ्या अपघाताला सुपा येथील टोलनाका जबाबदार असल्याचा आरोप मनसे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी केला आहे. तसेच या होणाऱ्या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभागावर (Public Works Department) गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची जबाबदारी टोल प्रशासनाने घ्यावी अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
23 व्यक्ती मृत पावले
रस्त्यावर दुभाजक तुटलेले, गतीरोधक नाही, सूचना फलक नाही, सर्व्हिस रोड नाही, हेल्पलाइन नंबर नाही, रुग्णवाहिका नाही, साइड पट्ट्या भरलेल्या नाहीत, लाईट कटर नाहीत, रस्ताने स्ट्रीटलाइट नाही, क्रेनची सुविधा नाही, रस्त्यावर वाढत चाललेली अतिक्रमणे, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यामुळे या महामार्गावर वारंवार अपघात होत असून अलिकडील काही दिवसांत याच मार्गावर 23 व्यक्ती मृत पावले आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
आठ ते नऊ मोठे अपघात
मागील काही दिवसांपासून नागरिकांकडून सातत्याने याविषयी आवाज उठवला जात आहे. आठ ते नऊ मोठे अपघात झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि चेतक इंटरप्रायझेसला नागरिकांनी जबाबदार धरले आहे. डिव्हायडर तुटलेले आहेत. महामार्गावर जे स्पीड ब्रेकर लावलेत, त्याआधी सूचनाफलक नाही. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा कोणताही अंदाज येत नाही.
‘मृतांच्या कुटुंबीयांची जबाबदारी घ्यावी’
अत्यंत निकृष्ट असे काम केल्याने रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. साइड पट्ट्या नसल्याने दुचाकीचालकांना महामार्गावरून जावे लागते. डिव्हायडर कोणी फोडले असा सवाल करत संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी येथील मनसेने मागणी केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांची जबाबदारी जोवर संबंधित लोक घेत नाहीत, तोवर मनसे शांत बसणास नाही, असे मनसेने म्हटले आहे.