20 किमीसाठी 80 किमीची टोलवसुली थांबवा, अन्यथा…; पुण्याच्या खेड-शिवापूर टोलनाक्याविरोधात कृती समितीनं काय इशारा दिला, वाचा…
शिवापूर टोलनाक्यावर 1 मार्चपासून पुन्हा पुणे आणि पिंपरी चिंचवड वाहन चालकांकडून टोल वसुली सुरू केली गेली आहे. यामुळे पुणेकर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून टोलनाक्यावर वादविवाद रोज होत आहेत.
पुणे : शहरापासून काही अंतरावर ते असणाऱ्या खेड-शिवापूर टोल नाक्याचा (Khed Shivapur toll plaza) वाद पुन्हा एकदा सुरू झाला आहे. याच टोल नाक्याच्या संदर्भात कृती समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये पुढील रविवारपासून जनआंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. या आंदोलनाचा (Agitation) पहिला टप्पा 1 मेपासून कात्रज चौकातील आंदोलनाने होणार आहे. आंदोलनाच्या माध्यमातून जणजागृती केली जाणार आहे. 25 किलोमीटरच्या टप्प्यासाठी 80 किलोमीटरचा टोलवसुली करण्यात येत आहे. ज्या महामार्गाच्या कामाचे टेंडर (Tender) 2010 रोजी झाले होते, त्याचे काम हे 2012पर्यंत पूर्ण करण्याची हमी देण्यात आली होती, तरीदेखील 10 वर्ष होऊनसुद्धा अद्याप काम पूर्ण होऊ शकलेले नाही, म्हणून टोल नाका नागरिकांची लूटमार करत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.
कृती समितीकडून निवेदन
शिवापूर टोलनाक्यावर 1 मार्चपासून पुन्हा पुणे आणि पिंपरी चिंचवड वाहन चालकांकडून टोल वसुली सुरू केली गेली आहे. यामुळे पुणेकर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून टोलनाक्यावर वादविवाद रोज होत आहेत. दरम्यान, भोर वेल्हा आणि हवेली येथील स्थानिकांना सूट देत आहोत, असे टोल प्रशासन आणि NHAIकडून सांगण्यात येत आहे. ही शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीची आणि लोक प्रतिनिधींची फसवणूक असल्याचे कृती समितीने म्हटले होते. या विषयावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला कृती समितीकडून निवेदनही देण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधींकडून प्रतिसाद नाही
पुण्यातील कात्रज येथे सरहद संस्थेच्या सभागृहात पुणे शहरातील सामाजिक संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणेकरांची बाजू कृती समितीने आंदोलनात वारंवार मांडली आहे . मात्र पुणेकरांचे लोकप्रतिनिधी प्रतिसाद देणार नसतील तर सामान्य जनतेसोबत ही लढाई लढावी लागेल. मात्र लोक प्रतिनिधींची टोलनाक्यांबाबतची अनास्था अनाकलनीय असल्याची टीका कृती समितीचे समन्वयक माऊली दारवटकर यांनी केली आहे. तर पुणे शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पुण्याच्याच्या टोल मुक्तीसाठी संघटित व्हा, अन्यथा शिवापूर टोलनाक्याचे भूत पुणेकरांच्या मानगुटीवर कायमस्वरूपी बसेल असा इशारा त्यांनी बैठकीत दिला.
20 किलोमीटरसाठी पुणेकरांना 80 किलोमीटरचा टोल
मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी मराठा महासंघाच्या सर्व शाखा या आंदोलनात उतरतील, असे जाहीर करत हे आंदोलन जनआंदोलन म्हणून उभे करू, असे जाहीर केले आहे. केवळ 20 ते 25 किलोमीटरसाठी पुणेकरांना 80 किलोमीटरचा टोल भरावा लागत आहे. महामार्गाचे काम अपूर्ण असतानाही तब्बल 10 वर्षे पुणेकरांकडून बेकायदा टोल वसूल केला गेला, तरीही पुण्यातील लोकप्रतिनिधी थंड कसे? काहीतरी गौडबंगाल आहे, असा आरोप कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केला.
सह्यांची मोहीम
1 मेच्या आंदोलनात सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. यात MH12साठी टोल मुक्तीची आग्रही मागणी करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीकडून देण्यात आली आहे. तसेच कोल्हापूरच्या धर्तीवर पुणेकर हे जन आंदोलन उभे करतील, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.