Pune : स्वारगेट बस स्थानकात गर्दीच गर्दी! गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्यांसाठी एसटी प्रशासनाकडून जादा बसेस
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून कोकणासाठी आणि राज्यातील इतर भागासाठी या जादा बसेस सोडणार असून, गणेशोत्सवाच्या काळातील दहा दिवसांमध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन या बसेस कमी-जास्त होतील, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
पुणे : आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यासाठी राज्यात सर्वत्र तयारी सुरू झालेली पाहायला मिळत आहे. या गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) आता राज्यातले एसटी प्रशासनदेखील सज्ज झाल आहे. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच कोकणातला गणेशोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेशोत्सवासाठी पुणे आणि मुंबईतून हजारो चाकरमानी हे कोकणात जात असतात. त्यासाठी पुणे एसटी प्रशासनाने (ST Mahamandal) देखील मोठी तयारी केली आहे. गणेशोत्सवासाठी जवळपास 356 जादा बसेस सोडण्याचा निर्णय पुणे एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यातच आता जवळपास 70 टक्के तिकीट हे ऑनलाइन (Online ticket) पद्धतीने बुक झाली असल्याची माहिती देखील एसटी प्रशासनाने दिली आहे.
कोकणासाठी आणि राज्यातील इतर भागासाठी जादा बसेस
स्वारगेट बस स्थानकावर गावी जाणाऱ्या मोठी गर्दी आज झालेली पाहायला मिळत आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून कोकणासाठी आणि राज्यातील इतर भागासाठी या जादा बसेस सोडणार असून, गणेशोत्सवाच्या काळातील दहा दिवसांमध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन या बसेस कमी-जास्त होतील, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. पुढील तीन दिवस ही गर्दी कायम राहण्याचा अंदाज आहे. कारण गणपतीनंतर गौरींचेदेखील आगमन होणार असल्याने गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असणार आहे. बसस्थानकात सर्वत्र प्रवासी दिसत होते. आज रविवार तर परवा गणरायाचे आगमन होत आहे. त्यामुळे आजपासूनच प्रवासी गावाकडे जाण्यासाठी लगबग करीत आहेत. जवळपास 70 टक्के बस ऑनलाइनरित्या बुक झाल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.
स्वारगेट बसस्थानकात प्रवाशांची गर्दी
कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफी
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलमाफी जाहीर केली. त्यानंतर पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर, खेड-शिवापूरच्या राजगड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांकडून पास वाटप करण्यात येत आहे. हे पास परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य धरण्यात येणार आहेत. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर यादरम्यान ही टोलमाफी असणार आहे. त्याचबरोबर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या गाड्यांसाठी टोलनाक्यावर स्वतंत्र लेनही करण्यात आली आहे.