महसूल आयुक्तांनी ८ लाख रुपये घेतल्याचे प्रकरण, सीबीआयची छापेमारी, अनिल रामोड यांना अखेर अटक
सीबीआयने शोध घेत असताना अधिकाऱ्याकडून सुमारे सहा कोटी रुपयांची रोकड जप्त केली. डॉ.अनिल गणपतराव रामोड असे अटक आरोपीचे नाव आहे.
अभिजित पोटे, प्रतिनिधी, पुणे : अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांना अखेर सीबीआयकडून अटक करण्यात आली. 8 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अतिरिक्त उपायुक्तांना CBI कडून अटक झाली. आज दुपारी पुण्यातील महसूल विभागाच्या त्यांच्या कार्यालयात सीबीआयने छापेमारी केली होती. त्यानंतर आता अनिल रामोड यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अनिल रामोड हे आयएएस अधिकारी आहेत. महसूल विभागात ते उपायुक्त म्हणून कार्यरत होते.
सहा कोटींची रक्कम जप्त
सीबीआयने शोध घेत असताना अधिकाऱ्याकडून सुमारे सहा कोटी रुपयांची रोकड जप्त केली. डॉ.अनिल गणपतराव रामोड असे अटक आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे (NHAI साठी पुणे), सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांचे लवाद) यांच्याविरुद्ध तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
१४ स्थावर मालमत्तांची कागदपत्र
पुण्यातील तीन ठिकाणी आरोपींच्या अधिकृत आणि निवासी जागेवर झडती घेण्यात आली आहे. त्यामध्ये 6 कोटी (अंदाजे) रुपये सापडले. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावावर असलेल्या 14 स्थावर मालमत्तांसह मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे सापडलीत. गुंतवणूक आणि बँक खाते तपशील आणि इतर दोषी दस्तऐवजावरून ही जप्तीची कारवाई केली आहे. अटक आरोपींना उद्या शिवाजीनगर, पुणे (महाराष्ट्र) येथील सक्षम न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
सीबीआयने रंगेहाथ पकडले
चार दिवसांपूर्वी तक्रारदाराने तक्रार केली होती. संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ८ लाख रुपयांची लाच घेताना अनिल रामोड सापडले. सीबीआयने त्यांना रंगेहाथ पकडले. अनिल रामोड यांच्या औंध-बाणेर परिसरातील ऋतुपर्ण सोसायटीतील बंगल्यावरही सीबीआयने छापेमारी सुरू केली. सीबीआयने बड्या अधिकाऱ्याला अटक केल्याने मोठी खळबळ उडाली. सीबीआयमधील डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.