विनय जगताप, भोर, पुणे | 25 जुलै 2023 : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. इर्शाळवाडीत घटनेनंतर प्रशासन सजग झाले आहे. यामुळे पुणे येथून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट रस्ता बंद केला आहे. या ठिकाणांवरुन वाहनधारक जाऊ नये, यासाठी प्रशासनाने अडथळेही लावले आहे. परंतु ते अडथळे पार करत धोकादायक पद्धतीने प्रवास वाहनधारक करत आहेत.
पुणे येथून कोकणाकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. वरंधा घाट आणि ताम्हिनी घाटाने कोकण गाठता येते. वरंधा घाटात दरड कोसळण्याचा धोका जास्त आहे. या ठिकाणी अरुंद रस्ते आहेत. अनेक वळणे आहेत. त्याऐवजी ताम्हिनी घाट सुरक्षित आहे. यामुळे हवामान खात्याकडून रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना वरंधा घाट बंद केला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हा रस्ता बंद आहे. तसेच अवजड वाहतुकीसाठी हा रस्ता ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण बंद आहे. यासंदर्भात रायगड आणि पुणे प्रशासनाने आदेश काढले आहे.
वरंधा घाटात पुणे आणि रायगड जिल्ह्याची सीमा आहेत. या ठिकाणी मुरूम मातीचे ढिगारे लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. परंतु त्यानंतरही धोकादायक पद्धतीने वाहन ढिगाऱ्यांवर टाकून वाहतूक सुरू आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही वाहनचालक ऐकत नाही. यामुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेकवेळा अचानक दरडी कोसळत असतात. झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा घटनाही घडतात. यामुळे 22 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान अवजड वाहतुकीकरीता वरंधा घाट पूर्णपणे बंद केला आहेत. तर हवामान खात्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना हलक्या वाहनांही बंद घातली आहे. संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा
पुणे घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद, प्रशासनाने काढले आदेश, काय आहे कारण