पुणे : बिबवेवाडी (Bibwewadi) येथील क्लाइन मेमोरियल शाळेनंतर पुण्यातील उंड्री (Undri) येथील युरो शाळेत ही पुन्हा बाऊन्सरकडून (Bouncer) पालकांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. शालेय शुल्काबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या, त्या विद्यार्थ्यांना शाळेने मेलद्वारे टीसी पाठवले आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेला आहे. तर प्रवेशावेळी पालकांना बाऊन्सरकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. बिबवेवाडी येथील शाळेतील बाऊन्सरकडून पालकांना झालेल्या धक्काबुक्कीचा मुद्दा विधानसभेतही चर्चिला गेला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या त्यावेळी सूचना दिल्या होत्या. या प्रकारामुळे शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला शाळेकडून केराची टोपली दाखवली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. आता शिक्षणमंत्री अशा मुजोर शाळांवर काय कारवाई करतात, ते पाहावे लागेल. या प्रकारानंतर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बिबवेवाडीतील एका शाळेत बाऊन्सरने पालकाला मारहाण केलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये शाळेत निवदेन घेऊन गेलेल्या पालकाला तेथे उपस्थित असलेल्या बाऊन्सरने मारहाण केली होती. पालकाने गैरवर्तन केल्याचा आरोप करत बाऊन्सरने ही मारहाण केली, काठीने चोप देत पालकाला पायऱ्यांवरून खाली ढकलून दिले. या घटनेचा सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मयूर गायकवाड वय (49 वर्षे) असे मारहाण झालेल्या पालकाचे नाव. या व्हडिओमध्ये महिला बाऊन्सर हातात की काठी घेऊन पीडित मयूर गायकवाड यांना हात उचलता, असे म्हणत मारहाण करताना दिसत होते. त्याचबरोबर चला बाहेर निघा असं म्हणत धक्का देता बाहेर काढत असल्याचे सामोर आले. महिला बाऊन्सरबरोबर तिचा पुरुष सहकारीही महिलेला पालकाला हकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसून आले.
पीडित मयुरेश गायकवाड हे बिबवेवाडी परिसरात वास्तव्यास आहेत. तेथील क्लाईन मेमोरिअल स्कूल या शाळेत त्याचा मुलगा शिक्षण घेत आहे. घटनेच्या दिवशी पीडित पालक शाळेने भरायला लावलेल्या फीच्या रक्कमेबाबत प्रिन्सिपलने विचारणा करण्यासाठी शाळेत गेले होते. त्यांच्या सोबत फी भरण्यासंदर्भात लेटर मिळालेले इतर पालक ही होते. शाळेत गेल्यानंतर पीडित पालक व इतर पालकांनी मिळवून त्यांचे लेखी म्हणणे प्रिन्सिपलकडे मांडून त्याची पोचपावती मागितली. मात्र याच वेळी शाळेच्या प्रिन्सिपल यांनी शाळेचं बाउन्सर बोलावून पीडितांसहा इतरांना धक्काबुक्की करत, ढकलून बाहेर काढण्यास सांगितले होते.