इंदापूर (पुणे) : कोरोनाच्या काळात देशभरासह महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या शाळा बंद होत्या. मात्र आता कोव्हिडची परिस्थिती सावरु लागल्यानंतर बऱ्याचशा शाळा सुरु झालेल्या आहेत. त्यामध्ये दिवाळीनंतर इंदापूर तालुक्यातल्या दोन शाळा नियमितपणे सुरु आहेत. ‘अफ्टर कोव्हिड स्कूल ओपनिंग पॅटर्न’ नुसार निमगावकेतकी येथील ‘भोसलेवस्ती’ व ‘हेगडे वस्ती’ या ठिकाणी ओसरी शाळा या विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि पालकांच्या प्रतिसादाने कोरोनाची काळजी घेऊन सुरु आहेत. (After Covid Indapur School Started)
एकीकडे कोरोनामुळे आरोग्याचा धोका तर दुसरीकडे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भिती, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व भविष्यात शाळा सुरू झाल्यावर अभ्याक्रम पूर्ण करताना शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची दमछाक होऊ नये यासाठी इंदापुरातील पंचायत समितीचा शिक्षण विभाग गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील आहे.
इंदापूर तालुक्यातील लॉकडाउनच्या काळातही इंदापूर येथील शिक्षण विभाग काही ना काही उपक्रम सुरु ठेवत होते. ‘शाळा बंद पण शिक्षण चालू’ हा उपक्रम कोरोना काळातही सुरु होता. ऑनलाइन पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा, विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक टास्क, असे उपक्रम पंचायत समिती राबवत होती.
दिवाळीनंतर इंदापूर तालुक्यातील काही शाळांमध्ये ओसरी शाळा हा उपक्रम सुरू केलेला आहे. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ पातळीवरुन तसे आदेश आल्याने इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेमध्ये हा उपक्रम दिवाळीनंतर सुरु केलेला आहे. इंदापूर तालुक्यातील निमगावकेतकी येथील ‘भोसलेवस्ती’ आणि ‘हेगडेवस्ती’ या ठिकाणी ओसरी शाळा या दिवाळीपासून नियमितपणे सुरु आहेत.
यातील भोसलेवस्ती येथील शाळेचा पट 123 आहे. सध्या नियमितपणे या शाळेत 110 पर्यंत विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. हेगडे वस्तीचा शाळेच्या विद्यार्थ्यांचा पट हा 23 आहे व तेथेही वीस पेक्षा जास्त विद्यार्थी नियमितपणे हजर राहत असतात.
शाळेसमोरील असलेल्या झाडांच्या सावलीमध्ये या शाळा नियमितपणे सुरु आहेत. या शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेण्यात आलेले आहे. शाळा भरण्यापूर्वी पालक आपापल्या पाल्यांना या शाळेत घेऊन येतात. शाळेत आल्यानंतर येथील शिक्षक विद्यार्थ्यांच्या हातावरती सॅनिटायझर तसेच त्यांचे टेम्परेचर चेक करतात. विद्यार्थ्यांच्या बसण्याचं ठिकाण हे पूर्णपणे सॅनिटायझर केलेले असते. तसेच दोन विद्यार्थ्यांमध्ये शारिरीक अंतर ठेवून तेथील शिक्षक वर्ग उत्कृष्टपणे नियोजन करीत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देतात. त्यामुळे कोरोनाच्या या भयंकर काळातही इंदापूर तालुक्यातील या दोन शाळा नियमितपणे दररोज सुरू आहेत.
अशाच पद्धतीने इंदापूर तालुक्यातील इतरही शाळा हळूहळू सुरु होणार असून या दोन शाळेचा बोध तालुक्यातील इतर शाळांनी घ्यावा, असे आवाहन शिक्षण अधिकारी यांच्याकडून केले जात आहे. अशा पद्धतीने जर महाराष्ट्रातील प्राथमिक शाळा सर्वत्र सुरू झाल्या तर वाया जात असलेल्या शैक्षणिक वर्षाची चिंता मिटेल व मुलांनाही ही योग्य शिक्षण मिळेल हे नक्कीच.
(After Covid Indapur School Started)
संबंधित बातम्या
Maharashtra school reopening date कोणत्या जिल्ह्यात शाळा सुरु होणार आणि कोणत्या जिल्ह्यात नाही?