पुणे : पुण्यातील दर्शना पवार हत्याकांडातील आरोपी राहुल हंडोरे याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. पाच दिवस बेपत्ता झाल्यानंतर राहुल अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. त्याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने पोलिसांसमोर भडाभडा माहिती दिली. दर्शनाची हत्या आपणच केल्याचंही त्याने सांगितलं. दर्शनाची हत्या का केली? त्या मागचं कारणही त्याने सांगितलं आहे. तसेच हत्या केल्यानंतर तो कोणत्या कोणत्या राज्यात लपला होता याची माहितीही त्याने पोलिसांना दिली आहे.
राहुल हंडोरे याने दर्शना पवारचा खून केल्यानंतर तो घाबरून गेला होता. त्यामुळे तो पंजाबमधील चंदीगडला पळून गेला होता. त्यानंतर तिथून तो पश्चिम बंगालला पळून गेला होता. पश्चिम बंगालमध्ये राहिल्यानंतर तो दिल्लीत गेला. त्यानंतर गोव्यातून तो मुंबईत आला होता, असं सूत्रांनी सांगितलं. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी जाळं पसरलं होतं. पण तो पोलिसांच्या हातात येत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी एक ट्रिक वापरली. राहुलला अटक करण्यासाठी पोलिसांनी थेट त्याच्या कुटुंबीयांचीच मदत घेतली. त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीने राहुलला परत येण्याची भावनिक साद घालण्यात आली. त्यानंतर पोलिसांना राहुलचं लोकेशन कळलं आणि आणि पोलिसांनी त्याला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकातून अटक केली.
दर्शना आणि राहुल हे लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. दर्शना ही नगरच्या कोपरगावमध्ये राहत असली तरी तिचं सिन्नरला आजोळ आहे. सिन्नरला दर्शनाच्या मामाचे घर आणि राहुलचे घर बाजूला होते. तेव्हापासून ते एकमेकांना ओळखत होते. राहुल सुद्धा एमपीएससीची तयारी करत होता. कुटुंब चालवण्यासाठी तो फूड डिलिव्हरी बॉय म्हणून पुण्यात काम करत होता. दर्शना आणि राहुल हे त्यानंतर पुण्यात आले. पुण्यात दोघांनी एमपीएससीची तयारी सुरू केली होती. पण राहुलला या परीक्षेत दोनदा अपयश आलं. तर दर्शना पहिल्याच प्रयत्नात पास झाली. ती फॉरेस्ट ऑफिसर झाली.
राहुलला दर्शनासोबत लग्न करायचं होतं. पण दर्शना फॉरेस्ट अधिकारी झाल्याने तिने राहुलला लग्नाला नकार दिला होता. दर्शनाच्या घरच्यांनी तिच्यासाठी मुलगाही बघितला होता. त्यामुळे राहुल संतापला होता. त्याचा राग त्याच्या डोक्यात गेला होता. त्यामुळे त्याने दर्शनाला गोड बोलून ट्रेकिंगला जाण्याचा आग्रह धरला. तिला तो राजगडावर ट्रेकिंगच्या बहाण्याने घेऊन गेला आणि तिथे तिच्याशी लग्नाचा वाद घालण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये वादावादी झाली. दर्शनाने लग्नाला ठाम नकार दिल्याने त्याने दगडाने ठेचून तिाच खून केला. सकाळी 8.30 वाजता राजगड किल्ल्यावर दोघे गेले होते. पण येताना तो एकटाच दिसून आला. रात्री 10.45 सुमारास राहुल एकटा परत आला होता, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.