Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या अडचणी वाढल्या, पुण्यातल्या कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल; धार्मिक भावना दुखावणारं केलं होतं वक्तव्य
पूर शर्मांविरुद्ध मुंबई आणि हैदराबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी, भारतीय सुन्नी मुस्लिमांच्या सुन्नी बरेलवी संघटनेच्या रझा अकादमीच्या तक्रारीनंतर शर्मा यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 295A, 153A आणि 505B अंतर्गत मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुणे : ज्ञानवापी मशिदीसंदर्भात (Gyanvapi Masjid) चर्चा करत असताना धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पुण्यात भाजपा महिला नेत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नवी दिल्लीतील भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्यावर पुण्यातील कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल गफुर अहमद पठाण (वय 47, रा. अशोका म्यूज, कोंढवा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पठाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी धार्मिक भावना दुखावल्या असल्याची तक्रार पुणे पोलिसांत (Pune Police)देण्यात आली होती. ज्ञानवापी मशिदीसंदर्भात सध्या देशभर वादंग उठले आहे. काही धर्मांध शक्तींकडून हा वाद निर्माण केला जात आहे. अशावेळी कोणत्याही चर्चेत सहभागी होताना जबाबदारीचे भान ठेवायला हवे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये. मात्र ते ठेवले गेले नाही, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
काय आहे प्रकरण?
सध्या देशभरात वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद प्रकरणाची चर्चा आहे. शुक्रवारी, 27 मे रोजी नुपूर एका राष्ट्रीय टेलिव्हिजन वृत्तवाहिनीच्या चर्चेत पोहोचल्या. चर्चेदरम्यान त्यांनी आरोप केला, की काही लोक सातत्याने हिंदू धर्माची खिल्ली उडवत आहेत. असे असेल तर आम्हीही इतर धर्मांची खिल्ली उडवू शकते, असे त्या म्हणाल्या होत्या. यावेळी त्यांनी धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्यही केले होते. यावरून मुस्लीम समाज आक्रमक झाला आहे.
विविध ठिकाणी गुन्हे दाखल
याच प्रकरणी नुपूर शर्मांविरुद्ध मुंबई आणि हैदराबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी, भारतीय सुन्नी मुस्लिमांच्या सुन्नी बरेलवी संघटनेच्या रझा अकादमीच्या तक्रारीनंतर शर्मा यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 295A, 153A आणि 505B अंतर्गत मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचप्रमाणे हैदराबादमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून शर्मा यांच्याविरुद्ध सायबर क्राइम पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 153 (ए), 504, 505 (2) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘जीवे मारण्याच्या धमक्या’
एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान नुपूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता वाद तर निर्माण झाला आहे. मात्र उलट आपल्यालाच जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार त्यांनी दिल्ली पोलिसांकडे केली आहे.