अभिजित पोते, पुणे | 3 ऑगस्ट 2023 : पुणे शहराकडे गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाने लक्ष केंद्रीत केले आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या पराभवानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत. पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघाच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवर नेत्यांनीही पुणे शहराला महत्व दिले आहे. यामुळे १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर आता अमित शाह पुण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांचा खूप वेळ राखीव असणार आहे.
भाजपने मिशन २०२४ ची तयारी सुरु केली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी वाटली गेली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांना दिली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राहुल कुल यांच्याकडे दिली गेली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांना दिली आहे. विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर या जबाबदाऱ्या वाटल्या गेल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार १ ऑगस्ट रोजी दिला गेला. त्यानिमित्ताने ते जवळपास सहा ते सात तास पुण्यात होते. यावेळी विविध विकास कामांचे त्यांनी उद्धाटन केले. पुणे मेट्रोचे बटन दाबले. घरकुल आवास योजनेचे लोकार्पण केले. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 आणि 6 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात ते साखर महासंघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. परंतु या दौऱ्यातील बराचसा वेळ अमित शाह यांनी राखीव ठेवला आहे. या दौऱ्यात अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना ते भेटणार आहेत.
भाजपने मिशन २०२४ ची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यात भाजप आपला चांगला बेस तयार करण्याचा प्रयत्नात आहे. त्यासाठी आता अजित पवार यांनाही सोबत घेतले आहे. पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. ते मोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या तिन्ही जागांवर विजय मिळवण्यासाठी अमित शाह कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत का? यावर राजकीय चर्चा सुरु झालीय.