पुणे : स्पामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने (AHU) ही कारवाई केली आहे. सिंहगड रस्त्यावरील टोनी सोसायटीच्या व्यापारी संकुलात हा प्रकार सुरू होता. दरम्यान, थायलंडमधील एका महिलेसह तीन महिलांची सुटका या कारवाईदरम्यान करण्यात आली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर, पुणे ग्रामीणचे पोलीस (Pune rural police) अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक विजय चव्हाण आणि एएचयूचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्पावर छापा टाकला. विजय चव्हाण यांनी सांगितले, की संबंधित स्पा (Spa) कम मसाज सेंटरमध्ये अवैध धंदे सुरू असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. खात्री करण्याच्या उद्देशाने आम्ही डिकॉय ग्राहक पाठवले. त्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकला.
छापा टाकल्यानंतर स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे लक्षात आले. हे रॅकेट चालवल्याप्रकरणी या स्पाचा व्यवस्थापक याच्यासह अन्य तिघांविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले, की स्पा मॅनेजर आणि इतर तिघांनी तीन महिलांना जबरदस्तीने याठिकाणी आणले होते. पैसे देण्याचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. आता या महिलांची सुटका करण्यात आली आहे.
चव्हाण यांनी सांगितले, की दोन सुटलेल्या महिला शहराच्या विविध भागातून आल्या आहेत. तर एक महिला मूळची थायलंडची असून ती दुबईत राहते. या तिघींनादेखीव पुणे शहरातील बचाव केंद्रात हलवण्यात आले आहे. दरम्यान, थायलंडमधील महिला भारतात कशी आली, तिचा प्रवास त्याचप्रमाणे सर्व कागदपत्रे आम्ही तपासत आहोत, असे पोलिसांनी सांगितले आहे.
शहरात अनेक ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली सर्रास अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांनी अशा सेंटर्सवर छापा टाकून कारवाई करण्याची मागणी होत आहे. काही स्पा तर निवासी संकुलातही थाटण्यात आल्याचे प्रकार याआधी समोर आले होते. त्यामुळे अशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.