पुण्यात पुन्हा रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यात होणार काटे की टक्कर?
28 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला होता. आता पुढच्या निवडणुकीसाठी तयारी होताना दिसत आहे.
पुणे : कसब्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. 28 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला आहे. भाजपने हेमंत रासने यांना मैदानात उतरवले होते तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर मैदानात होते. या निवडणुकीच्या विजयाकडे राज्यभरातील लोकांच्या नजरा लागल्या होत्या. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजुचे दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. महाविकासआघाडी आणि भाजप दोन्ही बाजुने निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. पण शेवटी बाजी मारली ती काँग्रेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी.
कसबा विधानसभा मतदारसंघ हा 1995 पासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. सलग 25 वर्ष गिरीश बापट येथून आमदार म्हणून निवडून आले. पण 2019 साली गिरीश बापट खासदार झाल्यानंतर त्यांच्या जागी मुक्ता टिळक यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेसला भाजपचा गडात सुरुंग लावण्यात यश आलं आणि या मतदारसंघातून आता रवींद्र धंगेकर प्रतिनिधीत्व करत आहेत.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकी संपत नाही की आता लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. खासदार गिरीश बापट यांची प्रकृती ठिक नसल्याने ते पुन्हा खासदारकीला उभे राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता पुण्यातून कोण-कोण खासदारकीला उभं राहणार याबाबत पुणेकरांमध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपचे हेमंत रासने यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर त्यांनी देखील आता खासदारकीची तयारी सुरु केल्याचं दिसत आहे.
पुण्याचे माजी महापौर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. दुसरीकडे काँग्रेसकडूनही लोकसभेसाठी कोणतं मोठं नाव चर्चेत नाही. त्यामुळे धंगेकर यांनाच लोकसभेसाठीसुद्धा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. भाजपने 25 वर्षे राखलेला गड पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या हातून गेला आहे. लोकसभेला तिकीट देताना पुण्यात पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, रविंद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून आणि हेमंत रासने यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. पेटेन उद्या मी नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही अशा आशयाचे लावले बँनर रासने यांनी लावले आहेत. विजयासाठी संघटना नाही तर मी वैयक्तिक कमी पडलो असं पोस्टरमधून जाहिररीत्या रासनेंनी मान्य केलं आहे.