Ajit Pawar : घर फोडण्याची सुरुवात कुणी केली? पवार कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा अजितदादांना सवाल; या दिवाळीत पवार कुटुंबिय एकत्र येणार?
Baramati Constituency Pawar Family Diwali Celebration : दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजितदादा त्यांच्या समर्थकांसह महायुतीत डेरेदाखल झाले. त्यानंतर पवार कुटुंबात पण मतभेद असल्याचे समोर आले. लोकसभा निवडणुकीत तर प्रकर्षानं बारामती राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आलं. या दिवाळीत सर्व पवार कुटुंबिय एकाच फ्रेममध्ये दिसतील का?
राज्याच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी भली मोठी घडामोड घडली. शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीत भली मोठी फूट पडली. अजितदादा यांच्या नेतृत्वातील मोठा गट राष्ट्रवादी पक्ष, चिन्हासह महायुतीच्या गोटात शिरला. अजितदादा महायुतीत डेरेदाखल झाले. त्यानंतर बारामतीत पवार कुटुंबियांशी त्यांचा जिव्हाळा आटल्याच्या बातम्या आल्या. लोकसभा निवडणुकीत तर पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला. बारामती राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आलं. त्यानंतर जाहीर मंचावरून अजितदादांनी त्यांची चूक मान्य केली. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बारामती मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे या दिवाळीत सर्व पवार कुटुंबिय एकाच फ्रेममध्ये दिसतील का? असे कुतुहल पण अनेकांच्या भाबड्या मनात उठले आहे.
अजितदादांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेत नाही
माझी आई अस काही बोलली असेल अस मला वाटत नाही. कारण माझी आई राजकारणात पडत नाही. युगेंद्र हा तिचा नातू आहे, त्यामुळे तिचा काय जीव असतो नातवावर हे सगळ्यांना माहिती आहे. चूक झाली असं अजित पवार म्हणाले मी काय त्याला गांभीर्याने घेत नाही, असा घरचा आहेर श्रीनिवास पवार यांनी दिला.
घर फोडलं अस जर ते म्हणत असतील तर त्याची सुरुवात कोणी केली? असा सवाल श्रीनिवास पवार यांनी अजितदादांना केला आहे. बारामतीकर सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे की काय करायचं आहे. युगेंद्र राजकारणात निर्णय घ्यायला त्याचा सक्षम आहे. त्याचा निर्णय मी घेतलेला नाही, असे ते म्हणाले. युंगेद्र पवार यांचा निर्णय त्यांनीच घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मी तर अस मानत नाही की घर फुटलं, अजितच्या मनात तसा विचार येत असेल तर माहिती नाही, असा चिमटा ही श्रीनिवास पवार यांनी अजितदादांना काढला. शरद पवार यांच्या चुका काढण्याइतके अजितदादा मोठे झालेत का? असाही सवाल त्यांनी केला. दिवाळीला सगळे एकत्र येतील अस मला वाटत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र जो तो जिकडे तिकडे व्यस्त असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.
दादांनी चूक करु नये
त्या माझ्या आजी आहेत, त्यांच आणि माझ भावनिक नातं आहे. मला नात जपायच आहे, त्या माझी आजी आहेत, मला त्यांना या गोष्टीत आणायच्या नाहीत. तो त्यांचा विषय आहे, मी बोलण योग्य नाही त्यांना विचारायला पाहिजे. अजित पवार यांनी चूक करु नये असे युगेंद्र पवार म्हणाले. सभे मध्ये आपण मुद्दे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.