Baramati Ajit Pawar : ‘…त्याचा सर्वाधिक फटका गरिबांना’, बारामतीतल्या कार्यक्रमात जातीय वादावर काय म्हणाले अजित पवार?
सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे. जातीय सलोखा राखावा. सण उत्सवातून एकोपा राहावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. कोऱ्हाळे खुर्द (Korhale Khurd) येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
बारामती : सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे. जातीय सलोखा राखावा. सण उत्सवातून एकोपा राहावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. कोऱ्हाळे खुर्द (Korhale Khurd) येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास दत्ता भरणे (Dattatray Bharne) येणार होते. पण सोलापूरचे पालकमंत्री म्हणून त्यांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी जावे लागले, असे ते यावेळी म्हणाले. तर कार्यक्रमपत्रिकेत अजित पवारांनी यावेळी चूक दाखवून दिली. यावेळी अजित पवार म्हणाले, की गावांचा विकास व्हावा, चांगल्या सुविधा मिळाव्यात हा आमचा प्रयत्न आहे. मात्र विकासकामांसाठी निधी आणताना मोठी कसरत करावी लागते. जेवढ्या सोयी करता येतील त्या करायचा आमचा प्रयत्न आहे. मी येणार म्हणून रस्ता केला. त्याचे काम नीट पूर्ण करा. कामाचा दर्जा नीट राखा. अधिकाऱ्यांना सूचना करा. तुम्ही शासनाचा पगार घेता. त्यामुळे कार्यकर्त्यांपेक्षा अधिकाऱ्यांनाच मी जबाबदार मानतो, असे ते म्हणाले.
‘कधीतरी बोलवा तमाशाला’
यावर्षी पाऊसकाळ चांगला होण्याचा अंदाज आहे. तर यात्रा उत्सव, उरुस सुरू आहेत. कुस्त्यांचे फड, तमाशाचे फड रंगत आहेत. इथे असतो का तमाशा, असे विचारत कधीतरी बोलवा तमाशाला, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. आजोबा म्हणायचे, अजित चल तमाशाला, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
‘राज्यात वीजेची टंचाई, काटकसरीने वापर करा’
वीजेची सध्या चणचण भासत आहे. काय होणार ही चिंता आहे. कोळश्याची टंचाई निर्माण झाली आहे. परदेशातून कोळसा आयात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे वीजेचा भारही वाढला आहे. मागणी वाढली आहे. बाहेरील राज्यातून वीज घेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी आवश्यक पाणी शिल्लक ठेवून उर्वरित पाणी वीजेसाठी वापरणार आहोत. दुसरीकडे, तुम्ही वापरत असलेल्या वीजेचे बील भरले पाहिजे, असे ते म्हणाले. माळेगावमध्ये वीजेचे माळ सुरू होती. हायमास्टही चालू होता. पण आता हायमास्टला बंदी घातली आहे. राज्यात काही ठिकाणी दिवसाही दिवे चालू ठेवतात. त्याचे पऱिणाम भोगावे लागतात, असे ते म्हणाले.
‘प्रिपेड पद्धतीने देणार वीज’
शेतकऱ्यांना अडचणींतून बाहेर काढण्यासाठी जे काही करता येईल, ते करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. वीजेच्या बाबतीतही काही निर्णय घेतले आहेत. आता वीज प्रिपेड पद्धतीने देणार आहे. गरज असेल तशी वीज वापरा. आता आकडा बंद. आकडा टाकून टाकून आमची वाट लागली. वीजबिल न भरणारांचा भार हा नियमीत बील भरणारांवर येतो.
‘जातीधर्मांत तेढ निर्माण करू नका’
सध्या राज्यात देशात काहीजण जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला बळी पडू नका. जातीय वादंगाचा सर्वाधिक फटका हा गरिबांना बसतो, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणुका, बारामती तसेत राज्यातील विकासकामे, कोरोनाकाळ, महाविकास आघाडी अशा विविध विषयांवर मते व्यक्त केली.
…अन् अजितदादा म्हणाले, मोबाइल फिरवून सेल्फी घे…
सत्कारानंतर एक कार्यकर्ता सेल्फी घेत होता. अजित पवार यावेळी म्हणाले, की मोबाइल फिरवून सेल्फी घे…