Ajit Pawar :अविनाश भोसलेंच्या अटकेचं मला काय माहिती, आता काय सीबीआयला विचारायला जाऊ? अजित पवारांचा खोचक सवाल
आज अजित पवार पुण्यात आहेत. अविनाश भोसले यांच्या अटकेबाबत अजित पवारांना विचारले असता, अविनाश भोसलेंबद्दल मला काम माहिती आता सीबीआयला विचारायला जाऊ का? असा खोचक सवाल अजित पवारांनी केला आहे.
पुणे : राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बोलायला उभे राहिले की टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडतो. कारण अजित पवारांचा स्वभाव हो रोखठोक आहे. हे गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने पाहिलं आहे. अजित पवार कधी सभेच्या स्टेजवरून कार्यकर्त्यांना झापतात. तर कधी अधिकाऱ्यांना धारेवर धरतात. तर कधी कार्यकर्त्यांपुढे मिश्किलपणे हातही जोडतात. हेच अजित पवार छातीठोकपणे भरल्या सभेतूनच विरोधकांना थेट आव्हानही देतात. आजही अजित पवारांच्या याच हटके स्टाईल भाषणाची पुन्हा प्रचिती आली आहे. काल पुण्यातले बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले (Avinash Bosale) यांना सीबीआयने (CBI) अटक केली आहे. त्यानंतर आज अजित पवार पुण्यात आहेत. अविनाश भोसले यांच्या अटकेबाबत अजित पवारांना विचारले असता, अविनाश भोसलेंबद्दल मला काम माहिती आता सीबीआयला विचारायला जाऊ का? असा खोचक सवाल अजित पवारांनी केला आहे.
शरद पवारांच्या गणपती दर्शनाबाबत म्हणतात…
तर शरद पवारांनी आज दगडूशेठ गणपतीचं बाहेरुनच दर्शन घेतलं त्यावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संविधानाने अधिकार दिलाय कुठंही जाण्याचा, मात्र कोणी सांगतं कोणी सांगत नाही, तसं बाहेरूनच काहीजण दर्शन घेतात, नाही गेलं तर म्हणतात नास्तिक आहेत आणि गेलं तरी अडचण, मात्र बाहेरून नमस्कार करायला अडचण काय ? असा सवालही अजित पवारांनी केला आहे.
उमेदवारी देण्याचा अधिकार सेनेकडे
तर संभाजीराजे यांच्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पवार साहेबांनी महाविकास आघाडीशी चर्चा करून निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. राष्ट्रवादीने आपली मतं शिवसेला द्यायचं ठरलं होतं संभाजीराजे आणि उद्धव ठाकरे मध्ये काय बोलणं झालं हे माहीत नाही. मात्र जागा देण्या बाबतचा अधिकार सेनेचा होता. या प्रकरणात पवारांवर आरोप होणे दुर्दैवी आहे. सर्व घटकांशी बोलूनच सहाव्या जागेचा निर्णय घ्यावा लागणार होता. त्यामुळे तसे अधिकार पवारांकडे नव्हते. शिवसैनिकाला उमेदवारी द्यायचं शिवसेनेने ठरवलं होतं, मात्र कोणत्याही कारणासाठी पवार साहेबांचे नाव घेण ही आता फॅशन झाली आहे, असेही ते म्हणाले आहेत.
ड्रग्ज प्रकरणावर काय म्हणाले?
दरम्यान यावेळी त्यांनी इतरही विवध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आपणचं बघा तरुण मुलाचं वय किती, त्याचे दिवस वाया गेली. त्यांची फॅमिली डिस्टर्ब झाली शाहरुख खाननं शुटींग सोडून दिलं होतं. ज्या काही यंत्रणा आहेत त्यांची चौकशी केली पाहिजे. त्यातून निष्पाप लोकांना अडवकलं जाऊ नये अशी सामान्य माणसाची भावना आहे. तसेच सीबीआय ,ईडी या यंत्रणांना चौकशी करण्यासाठी माहिती मिळाली तर बोलवू शकतील, असेही अजित पवार म्हणाले.