रणजित जाधव, Tv9 मराठी, पुणे | 6 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली. ईडीने ही कारवाई केली तेव्हा रोहित पवार परदेशात होते. ते आज मुंबईत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ईडीच्या या कारवाईवरुन त्यांनी आपले काका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बोट दाखवत आरोप केला. “गेल्या सात दिवसात दिल्लीत कोण गेलं होतं? भाजपचं कोण गेलं होतं? आणि अजितदादा मित्र मंडळाचं कोण दिल्लीत गेलं होतं? त्यावरून या छापेमारी मागच्या काही गोष्टी समजून येईल”, असं मोठं वक्तव्य रोहित पवारांनी केलं. याशिवाय ते यावरच थांबले नाहीत. “मी चूक केली असती तर मी परदेशातून आलो नसतो. नाहीतर अजितदादांबरोबर भाजपात जाऊन बसलो असतो. पण आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे”, असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी रोहित पवार बच्चा आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
“रोहित पवार बच्चा आहे, बच्चाच्याबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला मी उत्तरे द्यावी एवढा काय तो मोठा झालेला नाही. माझे कार्यकर्ते, प्रवक्ते उत्तर देतील”, अशी खोचक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. “हे जे काही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मागे माझ्याही 22 ठिकाणी कारवाई झाली होती हे तुम्हाला माहिती आहे का? शेवटी जर चौकशी करण्याचा अधिकार स्वायत्ता संस्थांना असतो. जर तथ्य असेल तर बाहेर येतं, तथ्य नसेल तर चौकशी होऊन जाते. आजच नाही. तपास यंत्रणा अशा अनेक प्रकरणांची चौकशी करत असतात. पण मीडिया फक्त ठराविक प्रकरणाला प्रसिद्धी देते. वर्षभरात अनेक जणांच्या चौकशा चालल्या आहेत”, असं अजित पवार म्हणाले.
यावेळी आणखी एका पत्रकाराने अजित पवारांना रोहित पवार यांच्याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला त्यावर त्यांनी “मी तुम्हाला मागेच सांगितलं ना, मी सोम्या गोम्यांना उत्तरे देत नाही”, अशी प्रतिक्रिया दिली. “काम करणाऱ्या संस्थांनी त्यांचं काम केलं पाहिजे. त्यांनी त्यांची जबाबदारी योग्यपणे पार पाडली नाही तर त्यांच्याविरोधात PIL दाखल करता येऊ शकते. आम्ही हे लक्षात आणून देतो तरी हे म्हणावं तसं लक्ष देत नाही”, असं अजित पवारांनी सांगितलं.