पुणे | 1 ऑगस्ट 2023 : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्याविरोधात सर्वत्र टीका केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिडे यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आज प्रतिक्रिया दिली. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भूमिका मांडली. “संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. अहो, एफआयआर दाखल झाल्यानंतर चौकशी होणार ना? चौकशी झाल्यानंतर पोलीस कुठल्या कलमाखाली काय करायचं याबाबत पुढची अॅक्शन घेणार”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
“राज्यात कुठल्याही महापुरुषांबद्दल कुणीही वाचाळवीरांनी असं बेताल वक्तव्य केलेलं कोणतंही सरकार खपवून घेणार नाही. त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील तीच भूमिका आहे. माझीही तीच भूमिका आहे. मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील आपली भूमिका मांडली”, असं अजित पवार म्हणाले.
“महात्मा गांधी, महात्मा फुले, शिर्डीचे साईबाबा हे देखील काही लोकांचे श्रद्धास्थान आहे. या देशात आपण संविधानाचा आदर करतो. कायदा-सुव्यवस्थेने देश आणि राज्य चालावा असं म्हणत असतो, त्यावेळेस प्रत्येकाला श्रद्धा आणि भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. फक्त त्या भावना व्यक्त करत असताना कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
“संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वांनी तीव्र शब्दांत निषेधच केला आहे. पोलीस कारवाई करतील. त्यांची चौकशी झाल्यानंतर पोलिसांना जे काही कलम वापरायचे आहेत, जे निर्णय घ्यायचे आहेत ते पोलीस घेतील, यात काही राजकीय हस्तक्षेप होणार नाही”, असा खुलासा अजित पवार यांनी केला.