Ajit Pawar vs Yugendra Pawar: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता प्रचाराचा धडका सुरु झाला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष बारामती मतदार संघाकडे असणार आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बारामतीमध्ये पवार कुटुंबियामध्ये लढत आहे. अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उतरवले आहे. लोकसभेत भावजय विरुद्ध नणंद म्हणजे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढत झाली होती. आता विधानसभेत ३३ वर्षांचे युगेंद्र पवार यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. युगेंद्र हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे पुत्र आहेत. त्यामुळे विधानसभेत काका विरुद्ध पुतणे अशी लढत होणार आहे. या लढतीत अजित पवार यांची बाजू भक्कम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात येणार होती. परंतु अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांना बारामतीत सभा घेऊ नये, अशी विनंती केली. कारण ही लढत परिवारामधील असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्रात आज करणार आहे. अजित पवार यांना नरेंद्र मोदी यांची सभा बारामतीमध्ये होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, बारामतीमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा होणार नाही. कारण या ठिकाणी होणारी लढत ही परिवारातील आहे. यामुळे अजित पवार यांनी परिवारास महायुतीपेक्षा मोठे स्थान दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र एनडीएचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे महायुतीकडून नरेंद्र मोदी यांच्या सभा जास्तीत जास्त ठिकाणी आयोजित करण्याचा प्रयत्न केले जात आहे. बारामतीमध्येही मोदींची सभा घेतल्यास बाजी पलटेल, असा दावा कार्यकर्ते करत आहेत. परंतु अजित पवार यांनी हा विषय परिवारातील असल्याचे सांगत मोदींना बारामतीपासून लांब ठेवले आहे.
बारामती विधानसभा मतदार संघावर शरद पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. सहा दशकापासून शरद पवार या भागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या ठिकाणी अजित पवार पराभूत झाल्यास त्यांच्याकडे पर्याय नसणार आहे. शरद पवार यांनी स्वत: ३० वर्षांपासून या भागातून प्रतिनिधित्व करत आहेत. त्यानंतर अजित पवार यांच्याकडे बारामतीची जबाबदारी दिली. परंतु अजित पवार एनडीएमध्ये गेल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. यामुळे अजित पवार यांचे भवितव्य ही निवडणूक ठरवणार आहे.