खोके म्हटलं तुमच्यासमोर कोण येतं? अजित पवार यांची चौफेर फटकेबाजी
पन्नास खोक्याचा शब्दप्रयोग करून तयार केलेले रॅपसाँग सध्या सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय होत आहेत. पोलिसांनी मात्र अशा दोन रॅपरविरोधात कारवाई केली आहे.
अभिजित पोते, पुणे : अवघ्या राज्याचं लक्ष सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्याकडे लागलं आहे. तर विरोधी पक्षांनीही शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरून टीका करण्याची एकही संधी सोडली नसल्याचं दिसतंय. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली. तर अजित पवार यांनीही पुण्यातील एका कार्यक्रमात मिश्कील टोलेबाजी केली. रॅपसाँग करणाऱ्या मुलाला ताब्यात घेण्यात आल्यावरून अजित पवार यांनी टोला लगावला. त्याने कुणाचं नाव घेतलं नव्हतं. आता खोके म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं… असं वक्तव्य अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत केलं..
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. भाषणादरम्यान ते म्हणाले, ‘ एका रॅप करणाऱ्या मुलाला तुरुंगात डांबलं गेलं. त्याने कुणाचं नाव घेतलं नव्हतं. तो बिचारा गाणं गात होता. त्याने फक्त खोका म्हणलं होतं.. आता खोके म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं हे मी सांगायची गरज नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय.
कोणत्या रॅपरला ताब्यात घेतलं?
पन्नास खोक्याचा शब्दप्रयोग करून तयार केलेले रॅपसाँग सध्या सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय होत आहेत. पोलिसांनी मात्र अशा दोन रॅपरविरोधात कारवाई केली आहे. संभाजीनगरातील राज मुंगासे याच्यानंतर आज मुंबईतील उमेश खराडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. खराडे याच्या आई-वडिलांनाही ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. जितेंद्र आव्हाड यांनीदेखील आज या घटनेवरून तीव्र संतापव्य व्यक्त केला. अलिकडची तरुण पिढी रॅप गाण्यांतून वास्तवतेवर टोकदार भाष्य करत असते. मात्र त्यांच्याविरोधात कारवाई करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात असलस्याची टीका आव्हाड यांनी केली.
अजित पवार 17 तास नॉट रिचेबल?
कालपासून अजित पवार संपर्कात नव्हते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवारांसोबत काही आमदार असल्याच्याही चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र आज सकाळीच अजित पवार एका लग्नसमारंभात दिसून आले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘ आम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असलो आणि सार्वजनिक चेहरा असलो तरी कधीकधी त्रास होतो आणि विश्रांती घ्यावी लागते. पण त्याची शहानिशा न करता चुकीच्या बातम्या दिल्या जातात. अशावेळी मनाला वेदना होतात.
‘पत्रकारांवरचे हल्ले थांबायला हवेत’
भाषणात पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ‘ हल्लीची स्थिती गंभीर आहे. लोकशाहीच्या चौथया स्तंभावर वारंवार हल्ले झाले आहेत. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. महाराष्ट्र राज्यात या स्तंभावर वारंवार हल्ले होत आहेत. राज्याला हे शोभणारं नाही. वारीसे यांना मारलं गेलं हे चुकीचं. हे हल्ले थांबवण्यासाठी कायदा व्हायला हवा अशी मागणी होत आहे